विदेशरंग: भारत-भूतान मैत्रीचा अध्याय

स्वप्निल श्रोत्री

भूतानचे भारताच्या दृष्टीने भौगोलिक महत्त्व जास्त आहे. त्यामुळेच भारताने भूतानला आपल्या परराष्ट्र धोरणात विशेष स्थान दिले आहे. वर्ष 2019 चे स्वागत करण्यात संपूर्ण जग गुंतले असतानाच भूतानचे नवे पंतप्रधान लोत्से त्सेरिंग यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा भारताचा करून ही मैत्री अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा संदेश जगाला दिला आहे.

भारत व भूतान या दोन शेजारी राष्ट्रांचे मैत्रीसंबंध हे ऐतिहासिक असून आठव्या शतकात भारतातून गुरू पद्मसंभव या बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी भूतानला गेले होते. पुढे ते भूतानमध्ये गुरू रिंगपोशे या नावाने प्रसिद्ध झाले. (रिंगपोशे या शब्दाचा अर्थ सर्वोच्च गुरू असा होतो) पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण भूतानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला व अल्पावधीतच भूतान हे राष्ट्र बौद्ध राष्ट्र म्हणून नावारूपास आले.

वर्ष 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत व भूतान ही मैत्री अजूनच घट्ट झाली. 8 ऑगस्ट 1949 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूतानचे तिसरे राजे जिग्मे दोराजी वांगचुंग यांच्याबरोबर दार्जिलिंग येथे मैत्री – करार केला. ह्या करारानुसार भूतानच्या रक्षणाची जबाबदारी भारताने आपल्या खांद्यावर घेतली आहे. तेव्हापासून आजपर्यंत भूतानच्या सीमेचे रक्षण व भूतानच्या सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देण्याचे काम भारतीय लष्कर करीत आहे. भारताची भूतानबद्दल असलेली जबाबदारी किती आहे याचा प्रत्यय आपल्याला डोकलाम वादावरून येऊ शकतो.

भारताच्या उत्तरेला हिमालयाच्या कुशीत भूतान हे छोटेसे राष्ट्र 38,394 चौरस किलोमीटर क्षेत्रात वसले असून त्याच्या पूर्व, पश्‍चिम व दक्षिण सीमा भारताने तर उत्तर सीमा ही चीनने वेढलेली आहे. हिमालयाच्या कुशीत वसल्यामुळे हे राष्ट्र नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. हिमालयाच्या पोटातून वाहणाऱ्या बारमाही नद्या व मोठ्या प्रमाणात असलेली घनदाट झाडी हे पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू राहिली आहे. संपूर्ण भूतानची अर्थव्यवस्था ही पर्यटन एकाच विषयाकडे केंद्रित असल्यामुळे भूतानकडे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आहेत.

भारताच्या दृष्टीने भूतानचे भौगोलिक महत्त्व जास्त आहे. त्यामुळेच भारताने भूतानला आपल्या परराष्ट्र धोरणात विशेष असे स्थान दिले आहे. भारताच्या प्रत्येक नवीन पंतप्रधानांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याची सुरुवात ही भूतानच्या दौऱ्यापासून होते. वर्ष 1958 मध्ये पंडित नेहरू यांनी आपला भूतान दौरा हा वाहतुकीची साधने अचानक उपलब्ध न झाल्यामुळे चालत पूर्ण केला होता. त्यावेळी प्रवासाची अद्ययावत साधने उपलब्ध नव्हती तरीसुद्धा पंडित नेहरूंनी हा दौरा पूर्ण केला होता. भूतानला विशेष दर्जा देण्याची ही परंपरा पंडित नेहरू नंतर पुढील सर्व भारतीय पंतप्रधानांनी जपली त्यामुळे चीनच्या भूलथापांना बळी पडून भारताच्या विरोधात जाणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भूतान कधीच आला नाही.

भारत-भूतान मैत्री ही केवळ एकतर्फी नसून भूताननेसुद्धा ती जपली आहे. भूतानकडून भारताचा कायमच सन्मान केला जातो. भूतानचे विद्यार्थी शिक्षणासाठी भारताला प्रामुख्याने पसंती देतात. भारतीय चलन हे भूतानमध्ये अधिकृत चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे. भूतानच्या नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांप्रती व विशेषत: पंडित नेहरू यांच्यावरती विशेष असे प्रेम आहे. सार्क. सीमा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय व अंतर्गत दहशतवाद या मुद्द्यांवर भूतान भारताची बाजू उचलून धरतो.
उत्तरेचा चिनी ड्रॅगन तिबेटप्रमाणे भूतानला गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असला तरी आपल्या सुरक्षेच्या बाबतीत भूतान निश्‍चिंत आहे. जागतिक पातळीवर वेगवेगळ्या लष्करी आघाड्या घडत व बिघडत असताना त्यांच्यासमोर भूतानसारख्या छोटा राष्ट्राचा निभाव लागणे शक्‍य नाही; परंतु भूतानने आपल्या अस्तित्वाची व संरक्षणाची फिकीर कधीच केली नाही. कारण भूतानच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी भारतीय लष्कराने आपल्या खांद्यावर घेतली आहे. भूतानवर झालेले आक्रमण हे भारताकडून आपल्यावर झालेले आक्रमण समजण्यात येते. म्हणजेच संरक्षणाच्या बाबतीत भारत भूतानच्या बाबतीत कटिबद्ध आहे.

भूतानच्या आर्थिक समृद्धीबाबत भारत वचनबद्ध असून भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भूतानसाठी दरवर्षी विशेष आर्थिक तरतूद केली जाते. भारतातील पंचवार्षिक योजनांच्या पार्श्‍वभूमीवर भूतानमध्ये वर्ष 1961 पासून पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली त्याचा आराखडा भारताच्या नियोजन आयोगाने बनविला होता. रस्ते, साधन-सुविधा, आस्थापने व प्रशासनाच्या बाबतीत भारत-भूतान सहकार्य असून भारताच्या सीमा रस्ते प्राधिकरणाने (बीआरओ) भूतानमध्ये आत्तापर्यंत जवळपास 1,800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत. त्याचबरोबर भारताकडून भूतानच्या पारो आणि यांगकुला भागात विमानतळ बांधण्यात आले आहेत. संपूर्ण भूतानमध्ये रेडिओ स्टेशन, गृहनिर्माण प्रकल्प, शहरी भागात सिमेंट निर्मितीचे कारखाने यांसारखे प्रकल्प भारताने उभारले असून भूतानच्या विकासात भारताने आपले योगदान दिलेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)