भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना आता “ऑनलाइन’चे आव्हान

विजयकुमार कुलकर्णी

पुणे – मुळातच भुसार बाजारातील व्यापार पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. बदलता काळ, मॉल संस्कृतीचा येथील व्यापारावर परिणाम झाला आहे. आता तर मल्टिनॅशनल कंपन्यांनी भुसार व्यापाऱ्यांपुढे आव्हान निर्माण केले आहे. या कंपन्या पाच किलोचे पदार्थही घरी पोहचवत आहेत. या पार्श्‍वभूमीवर व्यापार टिकवून ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून पुण्याच्या मार्केट यार्डातील भुसार बाजाराची ओळख आहे. येथे किराणा माल घाऊक बाजारात मिळतो. त्यामुळे पूर्वी नगर, सोलापूरसह कोकण आणि पुणे जिल्ह्यातील व्यापारी येथून ठोक स्वरूपात भरत असत. तसेच येथे किरकोळ विक्रीही केली जायची. त्यामुळे शहर, उपनगर आणि जिल्ह्यातून सर्वसामान्य नागरिक येऊन येथे किराणा भरत. त्यांना ताजा आणि किरकोळच्या तुलनेत स्वस्त माल विकत मिळायचा. मात्र, मागील काही वर्षांची परिस्थिती बदलली आहे.

दुसरा जिल्हा, तालुक्‍यातील व्यापारी थेट होलसेल स्वरूपात भुसार आपल्या दुकानात मागवत आहेत. त्याचा फटका येथील व्यापारावर बसला आहे. त्यानंतर मॉल संस्कृती येथे रुजली आहे. तेथे सर्व माल एकाच ठिकाणी मिळतो. त्यामुळे येथे माल खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर काही दुकानदार किराणा माल थेट घरपोच करू लागले आहेत. त्याकडे नागरिक आकर्षित झाले आहेत. आता तर ऑनलाइन कंपन्या या व्यवसायात उतरू लागल्या आहेत.

भुसार बाजारात असलेल्या भावाच्या किंवा काळी वेळेस त्यापेक्षा कमी भावात घरपोच भुसार बाजाराच्या वस्तू पोहचवत आहेत. अलिकडच्या काळात बदलत्या परिस्थितीनुसार पती-पत्नी नोकरी करत आहेत. विभक्त कुटुंब पद्धत समाजात रूढ झाल्याने कुटुंबे लहान बनली आहेत. त्यांना किरणा खरेदीसाठी अथवा इतर कारणासाठी वेळ नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यातच किरकोळ विक्री बंद झाल्यापासून खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे.

आता काही दिवसांपूर्वी तीन वर्षांसाठी येथील व्यापाऱ्यांना किरकोळ विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश पणन मंत्रालयाने काढला आहे. परवाना घेण्यासाठी व्यापाऱ्यांना बाजार समितीकडे अर्ज करणे आवश्‍यक आहे. परवाना घेतल्यानंतर येथे ग्राहक येतील का, पुन्हा येथील विक्री वाढेल का, हा प्रश्‍न तर निर्माण झाला आहेच.

मात्र, ऑनलाइन कंपन्या घरपोच किराणा देऊ लागल्या आहेत. याचे फार मोठे आव्हान भुसार बाजारातील व्यापाऱ्यांपुढे आहे. या परिस्थितीत व्यापार टिकविण्यासाठी, वाढण्यासाठी व्यापारी कोणती भूमिका घेणार, काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच सध्याचा विचार केल्यास ऑनलाइन कंपन्यांचे बाजार समितीतील व्यापाऱ्यांपुढे मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)