कलंदर: भोपळे…

उत्तम पिंगळे

मी: सर नमस्कार, आज म्हटले तुमच्याबरोबर निवडणूक निकाल पाहू.
विसरभोळे: या या… अगदी सकाळीच आलात; पण थोडा काळ समजण्यासाठी वेळ लागेल व पूर्ण निकालाला तर जास्तच वेळ लागेल. तोवर आपण चहा घेऊ.
मी: पण एक्‍झिट पोलमुळे जनमानसाचा अंदाज तर आला आहे?
विसरभोळे: बरोबर, पण हे बघा टेक्‍नॉलॉजी सुद्धा सॅम्पलच्या बेसवर चालते. सॅम्पल जर ठीक नाही तर निकालही बदलू शकतात. हवामान खाते व पेपरमधील भविष्यसुद्धा चुकतेच ना?
मी: बरोबर, पण एकंदरीत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
विसरभोळे: आमच्या लहानपणी परीक्षा झाली की वहीपेन विसरून अगदी मनसोक्‍त खेळायचे. अभ्यासाची कटकट, गृहपाठ तसेच कोचिंग क्‍लासेसचे पेव नव्हते. पण निकाल जसा जवळ यायचा तसे शेजारपाजारचे काय भोपळे फुटले का? (म्हणजे परीक्षेचा निकाल लागला का?) असा थेट प्रश्‍न करीत असत. निकाल लागला नसेल तर लागला नाही सांगत असू. तसेच निकाल लागला असेल तर थेट मार्क सुद्धा सांगत असू आणि तसेही विचारणारा बिनदिक्‍कत विचारायचा.
मी: हो, पण आता तो जमाना गेला. असो म्हणजे तुमच्या मते आता उमेदवारांनी निवडणुकीची परीक्षा दिली आहे. त्यांचे भोपळे आता फुटू लागले आहेत.
विसरभोळे: बरोबर, आता त्यामुळे त्यांच्यातील धाकधूक थोडी कमी जास्त होत आहे. ज्यांची धाकधूक वाढत जाईल त्यांना समजून येईल की, त्यांचा पराभव आता जवळ आला आहे. हसू आणि आसू एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्‍तींच्या बाबतीत या भोपळ्यांमुळे येणार आहेत. आता काय होणार, जसे जसे भोपळे फुटतील तशी तशी त्यांना प्रसिद्धी मिळत राहील. एक्‍झिट पोल प्रसिद्ध झाल्यावर विरोधक नाराज आहेत. या नाराजीचे खापर ते प्रथम इव्हीएमवर टाकणार. बऱ्याच विरोधी नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घ्यायचे आधीच ठरवून टाकले आहे.

हे सर्व पार पडल्यावर आपल्याकडे टिपीकल प्रतिक्रिया प्रसिद्धीस येतील. सत्ताधारी म्हणतील, आम्ही हेच गृहीत धरले होते व त्याप्रमाणेच होत आले. हा सक्षम सरकारवर व पंतप्रधानांवर जनतेने दाखवलेला विश्‍वास आहे. विरोधकांनी आधीच आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे.त्यांचा पहिला राग इव्हीएमवर उठणार आहे तसेच त्यानंतर पूर्णपणे किंवा पन्नास टक्‍के व्हीव्हीपॅट मोजणीचा ते आग्रह धरणार. पण माझे म्हणणे असे आहे थोडावेळ इव्हीएम बाजूला ठेवा; पण गेले महिनाभराच्या सर्वेक्षणानंतर जो एक्‍झिट पोल निघाला आहे त्यावर हे नेते काही बोलले नाहीत.

जनमताचा कौल आपल्या बाजूने असेल तर “ऑल इज वेल’ आणि तसे नसेल तर मग उगा आगपाखड करायची हा शिरस्ता ठरला आहे. अगदी सध्याच्या सत्ताधारी भाजपनेही 2009 ला ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. असो, जो तो सोयीचे राजकारण करीत असतो. आता माझे हेच म्हणणे आहे की, निकाल जसे जवळ येतील तसे ज्यांची सत्ता येईल (बहुतेक सध्याचेच सत्ताधारी जिंकणार) तर त्यांनी त्यांच्यातील सध्याच्या उणिवा व अर्धवट राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्याचा निश्‍चय करावा. तसेच मागील सरकारने जगावर आपल्या भारताचा ठसा उमटवला तसा त्यांच्या कर्तृत्वाने देशामध्येही उठवावा व देशांतर्गत दीर्घ मुदतीची धोरणे मार्गी लावावीत. विरोधकांनीही आपला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला पाहिजे. उगाच तांत्रिक गोष्टीत वाद घालू नये. कुंपणावर असलेले पक्षही बरोबर सत्ताधारींजवळ उडी मारतील.पराजितांनी आपले काय चुकले व लोकांनी आपल्याला का नाकारले त्याचा अभ्यास करणे योग्य ठरेल कारण- “पब्लिक है ये सब जानती है।’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)