भीमा-चंद्रभागा : विठुरायाच्या चरणीच्या गंगा

श्रीक्षेत्र पंढरपूर हे भीमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदीला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नाव आहे.

चंद्रभागा नदी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून वाहणारी नदी आहे. ही भीमा नदीच आहे. भीमा पंढरपुराजवळून वाहताना चंद्रकोरीप्रमाणे वळण घेते म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. भीमा नदी पश्‍चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे 725 किलोमीटर आग्नेयेस वाहून मिळते. नीरा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर-नीरा या गावाजवळ कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदी भीमेस मिळते. महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेकदा भीमेला पूर येतो. भीमा नदीवर एकूण 22 धरणे आहेत. मुळा – मुठा आणि भीमा नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चंद्रभागा-भीमा नदी

भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी-भामा-नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीनवेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय “चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मं दिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर संत जनाबाई “भीमा आणि चंद्रभागा तू या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. 1850 सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्‍चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते, असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्‍वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सति, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संतमंडळी अभंगांतून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.

चंद्रभागा अख्यायिका

याविषयी अख्यायिका सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येऊन या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्‍त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले. काही संशोधकाचे मते भागवताच्या स्कंद 5 अध्याय 19 मधील 18 व्या श्‍लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी व चंद्रभागा या नद्यांचे अस्तित्व दाखविलेले आहे. तसेच महाभारताच्या भीष्मपर्वात अध्याय 9 मध्येदेखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला आढळतो. आनंद रामायणातदेखील भीमा नदीचा उल्लेख आढळतो. प्रभू रामचंद्रांनी सीताशोधार्थ लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग वर्णिला आहे.

धन्य धन्य भिवरातट । चंद्रभागा वाहे निकट । धन्य धन्य वाळुवंट । मुक्तिपेठ पंढरी ।
असे चंद्रभागेचे महत्त्व सांगितले आहे.

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ।।
उभे राहुनि दर्शन मंडपी ।
कृतार्थ करील जगजेठी ।।

ज्या वाळवंटी सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी नाचत, नामघोषात मग्न होऊन कृतार्थ झाली, त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा आणि ज्या चंद्रभागेच्या पवित्र स्नानाने संतासह लाखो भाविक, भक्‍त पापमुक्‍त झाले, धन्य झाले त्या तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्‍तजनांच्या मनी निर्माण होते.

कोटी कोटी जन्माचे पातक ।
नासे केलेया देख ।।
एवढे क्षेत्र अलौकिक ।
पांडुरंग भीवरा ।।
अशी या तीर्थस्नानाची ख्याती आहे.

भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्‍तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्‍तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे, त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळीची समाधिस्थाने आहेत. नदीचे पात्र विशाल, अर्धचंद्राकार व देखणे आहे.

चंद्रभागा नदीकाठचे पुंडलिक मंदिर

भक्‍त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. हे मंदिर चांगदेवाने बांधले आहे. मंदिरामध्ये मोठा सभामंडप असून आतील बाजूस गाभारा आहे. गाभऱ्यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या मुखवट्यावर टोप घालून नाममुद्रा लावून पूजा केली जाते, तसेच पहाटेपासून रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार, काकड आरती, महापूजा, महानेवैद्य, धूपारती इत्यादी करतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. चंद्रभागा नदीला पूर आल्यावर पुंडलिकाचा चलमुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेवून तिथे पूजा व नित्योपचार केले जातात.

गोपाळपूर

पंढरपुरातील गोपाळपूर या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचे मंदिर आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक जनाबाईच्या घुसळखांब घुसळल्याशिवाय जात नाही. चार प्रमुख एकादश्रयंना (आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्रीर) आलेले भाविक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी होणारा गोपाळकाला खाण्यासाठी येथे एकत्र जमतात.

विष्णुपद

या ठिकाणी सर्व लोक विष्णूच्या पावलांचे दर्शन घेतात. येथे मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंगाचे वास्तव्य असते. या मासात येथे भाविकांची खूप गर्दी असते. या ठिकाणी आजही श्रीकृष्ण व गायीच्या खुराचे ठसे दिसतात.

नदीवरील घाट

नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.2 किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे 1.6 किलोमीटरवर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्‍वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्‌वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्‌वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्‌वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्‍मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्‍वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला (विष्णूपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्‍वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्यावेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्‍काम ठोकतात.

नदीवरील घाट

1) अमळनेर, 2) अहिल्याबाई, 3) उद्धव, 4) कबीर, 5) कासार, 6) कुंभार, 7) खाका, 8) खिस्ते, 9) चंद्रभागा, 10) दत्त, 11) दिवटे, 12) मढे, 13) महाद्वार आणि 14) लखुबाई.

-दीपक कांबळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)