भिलारवाडीचा दूषित पाणीपुरवठा

पाणीपुरवठा विभागाला टॅंकर सुरू करण्याचे आवाहन
समीर मेंगळे

भुईंज – वेळे ग्रामपंचायतीचा भाग असणाऱ्या भिलारवाडीमध्ये सद्य:स्थितीत जो पाणीपुरवठा केला जातो तो दूषित असून त्यामुळे अनेक आजारांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. भिलारवाडीसाठी शिवकालीन पद्मावती तळ्यातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, आत्ताच्या स्थितीत तळ्यात शिल्लक असलेला पाणीसाठा अत्यंत दूषित झाला असून त्यातील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. तळ्यात साचलेल्या गाळाचे प्रमाणदेखील खूप आहे. तसेच त्यामध्ये असणारे छोटे मोठे मासे हे पाणी गढूळ करीत असतात. त्यामुळेच या गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असावा. नळाला येणारे पाणी हे गढूळ असून त्याची चवही काही वेगळीच आहे.

तसेच हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी जगण्यासाठी का होईना पण नाईलाजास्तव त्याचाच वापर करावा लागत असल्याने भविष्यात भयंकर आजारांना आयतेच निमंत्रण मिळून नागरिक अनेक रोगांनी ग्रस्त होणार यात काही
शंकाच नाही. तेव्हा वेळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ नये यासाठी संबंधित पाणीपुरवठा विभागाला योग्य तो निर्णय घेत भिलारवाडीसाठी त्वरित स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे आवश्‍यक आहे. गरज भासल्यास टॅंकरने पाणीपुरवठा केला जावा असेच सर्व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी ग्रामपंचायत सतत प्रयत्नशील आहे. नागरिकांना गरजेपुरता स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच गरज भासल्यास टॅंकर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंचायत समितीला तसा प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाली की लगेचच दूषित पाणीपुरवठा बंद होईल.

संतोष नलावडे, उपसरपंच, वेळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)