भाटघरच्या भिंतीलगतचे पूल धोकादायक : अपघाताचा धोका

ग्रामपंचायतींनी दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष 

– दत्तात्रय बांदल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाटघर – भाटघर धरणाच्या भिंती शेजारील तीनही पूल ब्रिटिशकालीन आहेत, हे सर्व पूल जीर्ण तसेच धोकादायक झाले आहे. यातील एक पूल अत्यंत अरुंद असून संरक्षक कठडे गायब झाले आहेत. यामुळे वाहन खाली कोसळण्याचा धोका आहे. तर, इतर दोन्ही पुलांवर खड्डे पडले असून सिमेंट वाहून गेल्याने स्टील उघडले पडले आहे. पूर्वी येथून चार चाकी वाहन सहज जात होते. परंतु, आता दुचाकी जाणेही अवघड झाले आहे. या तीनही पुलांना दगडाच्या खांबांचा आधार आहे. पूल जीर्ण झाल्याने दगड निखळत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास पूल वाहून जाण्याची शक्‍यता आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाटघर प्रशासनाने वेळेत उपाय योजना करावी, अशी मागणी संबंधीत गावच्या ग्रामपंचायतींकडून सातत्याने केली जात आहे.

माळवाडी गावाहून भाटघर जलविद्युत केंद्राकडे व नद्यांचा उगमाकडे जाताना पहिला पूल आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे. पुल जीर्ण तसेच संरक्षक कठडे गायब झाले आहेत. यामुळे वाहन खाली कोसळण्याचा धोका आहे. पूल अरुंद असल्याने जीवमुठीत घेऊन जावे लागते. भाटघर जलविद्युत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी एकूण 30 आहेत. विशेष म्हणजे या कामगारांना दररोज याच पुलावरून ये-जा करावी लागते. पर्यायी रस्ता नसल्याने नाईलाजास्तव याच पुलाचा वापर करावा लागत आहे. ही बाब भाटघर प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे, अशी चर्चा नागरिकांत आहे.

वेळवंडी नदी व नीरा नदी या दोन्ही नद्यांचा संगम होतो. याठिकाणी दुसरा पुल आहे. हा पुलही ब्रिटिशकालीन असून धोकादायक आहे. पुलावरील पाच ते सहा फूटाचा सिमेंट कॉंक्रीटचा भाग वाहून गेला आहे. खालील मुरूम उघडा पडला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस खड्डे असल्याने वाहन पुलावर आणताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. पुलाला दगडी खांबांचा आधार असला तरी डागडुजी अभावी दगड निखळत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास दक्षिणेकडील भाग वाहून जाण्याची शक्‍यता आहे. संगमनेर व माळवाडी येथील शेतकरी शेळ्या व जनावरे घेऊन चाऱ्याच्या शोधात जात असतात पूल तुटला तरी दोन्ही बाजूंचा संपर्क तुटू शकतो.

नीरा नदीवर तिसरा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाची लांबी मोठी असून तो ब्रिटिशांकालीन आहे. स्टील व सिमेंट कॉंक्रिटचा उपयोग करून पूल बांधलेला असला तरी खांब दगडी बांधकामातच आहेत. याही पुलाचा भाग वाहून जावून स्टील उघडे पडले आहे. काही स्टील पाण्यात बुडाल्याने ते दिसून येत नाही. येथे पोहताना याच स्टीलमध्ये अडकून आपला जीव अनेकांना गमवावा लागला आहे. या पुलावरील भागातही खड्डे पडले आहेत. खड्ड्यांच्या ठिकाणही स्टील उघडे पडले आहे. या पुलाची वाहतूक क्षमता संपली असल्याने तो तुटण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन उपाय योजना करण्याची गरज असल्याचे त्या-त्या गावांतील नागरिकांचे म्हणणे आहे.

भाटघर जलविद्युत निर्मिती केंद्राकडे सहा महिन्यांपूर्वीच हे रस्ते व पूल वर्ग करण्यात आले आहेत. सदर पुल धोकादायक झाले असले तरी दुरुस्तीबाबत आमच्याकडे अधिकार नाहीत. संबंधित विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
– अनिल नलावडे, शाखा अभियंता, भाटघर


भाटघरच्या शेजारील तीनही पुल धोकादायक झाले आहेत. तीनही पुलावरून कामगार, स्थानिक नागरिक ये-जा करतात. पूल धोकादायक झाल्याने अनेकांच्या मनात अपघाताची भीती आहे. प्रशासनाने याबाबींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
– रेश्‍मा बांदल, सरपंच, संगमनेर, भोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)