#भाष्य : …रहेंगे यही अपने निशाँ (भाग १)

-अंजली महाजन

राज कपूर यांच्या आठवणी जिथं साठवल्या आहेत, तो आरके स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतला आहे. कुटुंबीयांच्या दृष्टीने तो पांढरा हत्ती ठरला असून, आठवणी कायम ठेवून त्यांना तो विकावाच लागेल, असे कुटुंबीयांकडून सांगितले जाते. परंतु आरके स्टुडिओची विक्री व्हावी का? तिथं एखादा मॉल उभा राहावा का? की सरकारनं, मुंबई महापालिकेनं, बड्या औद्योगिक घराण्यांनी पुढे येऊन तिथं राज कपूर यांच्या स्मृती जपणारं संग्रहालय उभारावं?

ग्रेट शो-मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे राज कपूर यांचे स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख बनलेल्या आरके स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज कपूर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरके स्टुडिओ हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न असल्यामुळे कुटुंबाच्या आठवणी सदैव आरके स्टुडिओशी जोडलेल्या राहतीलच; परंतु कुटुंबाच्या दृष्टीने हा स्टुडिओ हा एक पांढरा हत्ती बनला आहे. कुटुंबातील वादाचे कारण ठरण्याआधीच या स्टुडिओची विक्री केलेली बरी, अशा निर्णयाप्रत कपूर कुटुंबीय आले आहेत.

मुंबईच्या चेंबूर भागातील दोन एकर जागेत विस्तारलेला आरके स्टुडिओ गेल्या वर्षीही चर्चेत आला होता, तो स्टुडिओत लागलेल्या भीषण आगीमुळे. या आगीत बॉलिवूडशी संबंधित बऱ्याच आठवणी जळून खाक झाल्या होत्या. नर्गिसपासून ऐश्‍वर्या रायपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आरकेच्या बॅनरखाली केलेल्या चित्रपटांमध्ये परिधान केलेले पोशाख, दागदागिने, मेरा नाम जोकर चित्रपटात राज कपूर यांनी परिधान केलेला जोकरचा मुखवटा अशा किमती साहित्याचा त्यात समावेश होता. या अग्नितांडवापासूनच आरके स्टुडिओत चित्रीकरण बंद करण्यात आले आहे.

आरके स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय योग्य आहे का, या विषयावर आता चर्चा होत आहे. या स्टुडिओचे रूपांतर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असेही मत व्यक्त होत आहे. सरकारने खरोखर असा प्रयत्न करायला हवा. अन्यथा 1955 मधला श्री 420, 1956 मधला जागते रहो, 1970 मधला मेरा नाम जोकर आणि त्यानंतरही बॉबी आदी चित्रपटांच्या निर्मितीच्या आठवणी असलेल्या या स्टुडिओचे रूपांतर एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये किंवा रहिवासी इमारतीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे हे एक प्रमुख आकर्षण असते.

एवढेच नव्हे तर मुंबई नगरीत काम शोधण्यासाठी येणाऱ्या शेकडो कलावंत युवक-युवतींच्या दृष्टीने आरके स्टुडिओ हे एक मंदिर आहे. गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, मुंबादेवी, वानखेडे स्टेडियम या वास्तूंप्रमाणेच आरके स्टुडिओ ही मुंबईची ओळख आहे. कपूर कुटुंबीयांना या स्टुडिओची देखभाल करणे अशक्‍य झाले असेल, तर राज्य सरकारने कपूर कुटुंबीयांना योग्य मोबदला घेऊन स्टुडिओ ताब्यात घेतला पाहिजे. असे झाल्यास हॉलिवूडच्या खालोखाल जगात लोकप्रिय असलेल्या बॉलिवूडची ही ओळख सुरक्षित राहू शकेल.

एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या राहत्या घराचे रूपांतर स्मारकात करण्याचा निर्णय सरकारे लगेच घेतात. त्यामुळे आरके स्टुडिओच्या बाबतीत याच दिशेने विचार सरकारने करायला हवा. ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती स्वतः मंचावरून उतरून खाली आले होते, त्या राज कपूर यांचे हे स्वप्न जपायलाच हवे.

#भाष्य : …रहेंगे यही अपने निशाँ (भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)