अकोला: राज्याच्या राजकारणात दोन दशकांत तिसरा राजकीय पर्याय असणारे “भारिप- बहुजन महासंघ’ हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर “भारिप-बहुजन महासंघ’ आंबेडकरांच्या नेत्रूत्वात तयार झालेल्या “वंचित बहुजन आघाडी’त विसर्जित करणार येणार आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ते अकोला येथील आज पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पक्ष विसर्जित करण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरु करणार येईल. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणातल्या रिपब्लिकन चळवळीतील “भारिप-बहुजन महासंघ’ नावाचे “पर्व’ संपणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजपाकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नातेवाईकांना खूश करणे, सत्तेत बसण्यासाठीची भाजपाकडून राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, या निर्णयातून आपल्या राजकीय कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. “रिपब्लीकन’ नावातून एकाच समाजाचे नेत्रूत्व करण्यापेक्षा “बहुजन’ नावाने सर्वांना सोबत घेण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे “वंचित बहुजन आघाडी’ ही प्रकाश आंबेडकर यांची नवी राजकीय ओळख त्यांना खरंच राजकीय ताकद देणारी ठरेल का याचं उत्तर येणारा काळच देईल.