भंडारदरा धरण तुडूंब

अकोले – जलसंपदा विभागाचे नियंत्रण झुगारून भंडारदरा धरणाने तुडूंब भरणे पसंत केले. 11 हजार 39 दलघफू साठवण क्षमतेचे हे धरण आज सकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या इतिहासात पहिल्यांना हे धरण दि. 15 ऑगस्टला भरल्याची नोंद झाली. तर आज सकाळपासून अकोले तालुक्‍यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

धरणाच्या 51 वर्षाच्या नोंदीत धरण फक्‍त 3 वेळा दि. 15 ऑगस्टपूर्वी धरणाने भरण्याचा विक्रम केला होता. त्यात आज शिरपेच खोवला गेला. स्वातंत्र्यदिनी हे धरण भरले गेल्याने धरणाखालील दुसरे निळवंडे धरण लवकरच भरेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. काल भंडारदरा धरणात 90 दलघफू नवीन पाणी आवक झाली. तर धरणाच्या टनेलमधून 992 क्‍युसेकचा विसर्ग सोडला जाण्यास सुरुवात झाली.

तर निळवंडे धरणातील शेतीसाठीच्या आवर्तनात 1 हजार 550 क्‍युसेकचा विसर्ग कायम आहे. या धरणाखालील निळवंडे धरणात 6 हजार 775 दलघफू पाणीसाठा झाला आहे. या धरणात नवीन 162 दलघफू पाण्याची आवक झाली. हे धरण 81 टक्‍के भरले आहे.तर आढळा धरणात 11 दलघफू नवीन पाणी आल्याने या धरणात 291 दलघफू पाणीसाठा झाला आहे. तर भोजापूर धरणात 141 दलघफू पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणात नवीन 233 दलघफू पाण्याची आवक झाली. या धरणात 16 हजार 777 दलघफू पाणीसाठा झाला आहे. जायकवाडी धरणात 47.162 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यातील अवघा 21 टक्‍केच उपयुक्‍त आहे.

गेल्या 24 तासात अकोले तालुक्‍यात पावसाची हजेरी फक्‍त धरण पाणलोटात होती. मात्र आज सकाळी 11 वाजेपासून सर्व दूर पावसाची रिमझिम सुरु आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. या पावसाने सुकणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. काल सकाळपासून भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र एकेरी वाहतूक असल्याने फारसा विस्कळीतपणा जाणवला नाही. मात्र वाहतूक संथगतीने सरकत होती.असे सांगण्यात आले.

गेल्या 24 तासात झालेली पावसाची नोंद पुढीलप्रमाणे मिली मीटर मध्ये : कंसातील अंक एकूण पावसाच्या नोंदीचे आहेत – भंडारदरा-11(2816), पांजरे- 9(3139), रतनवाडी-22(4092), घाटघर- 36 (4461), वाकी-8(2467).

पर्यटकाचा मृत्यू

याच आनंदाला एका पर्यटकाचा अनपेक्षितपणे मृत्यू झाल्याने काळी किनार लाभली. या दुर्दैवी घटनेमुळे भंडारदरा धरणाच्या सुरक्षिततेला पुन्हा ग्रहण लागले असल्याची चर्चा होती. सुभाष हरीभाऊ नलावडे (वय 44,रा.औरंगाबाद) हे काल सहपरिवार भंडारदरा येथे आले होते. त्यांनी परिसर पहिल्यानंतर हे कुटुंब धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या अंब्रेला फॉलच्या पायथ्याला निघाले होते. उत्तरेच्या बाजूने ते वन खात्याच्या रस्त्याने आले असता नलावडे यांना या फॉलचा मोह पडला आणि दुर्दैवाने फॉलच्या घसरणीत ते सापडले. त्या गडबडीत त्यांच्या डोक्‍याला मार लागला. ते त्यातच गतप्राण झाले अशी माहिती सूत्रांनी दिली. जखमी अवस्थेत त्यांना नाथू भांगरे व नामदेव भांगरे यांनी बाहेर काढले. राजूर येथे ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर त्यांना मृत्युमुखी असल्याचे घोषित केले. राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)