भंडारदरा “ओव्हरफ्लो’ ,उत्तर नगर जिल्ह्यासाठी सुखद वार्ता

निळवंडेही लवकरच भरणार

अकोले – भरणार की न भरणार अशा अनिश्‍चिततेच्या हिंदोळ्यावर असणाऱ्या व उत्तर नगर जिल्ह्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या भंडारदरा धरणाची सुखद बातमी लाभ क्षेत्राला मिळाली आहे. पाणी पातळी 10 हजार 500 दलघफूवर पोचल्यावर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याची घोषणा जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आज दुपारी केली. त्यामुळे लाभ क्षेत्रातील जनतेने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी पावसाळी हंगाम लक्षात घेवून या धरणातून पाणी सोडण्याला सुरुवात झाली. स्पिलवे, टनेल व अंब्रेला फॉल यांच्या माध्यमातून पाणी पातळीवर नियंत्रण ठेवले जात आहे. विसर्गाने या खालील निळवंडे धरण लवकरच भरेल यात शंका राहिलेली नाही. धरण परिसरात आषाढ सरी चांगल्या पडत राहिल्याने व भंडारदरा धरणातील सोडले जाणारे पाणी ध्यानी घेता निळवंडे धरण 7 हजार 200 दलघफू पाणी जमा झाल्यावर तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे घोषित केले जाईल. त्यांतर ही दोनही धरणे सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर पूर्ण क्षमतेने भरले जातील, असा प्राथमिक अंदाज आहे.

भंडारदरा धरण जुलै महिन्यात भरण्याला समान पाणी वाटप कायद्यामुळे मर्यादा आली होती. 31 जुलैपर्यंत या धरणात पाणी पातळी 9 हजार 100 दलघफू ठेवावी, असे निर्देश असल्याने हे धरण त्या पातळीवर ठेवले गेले. मात्र स्पर्धेच्या वातावरणात काहींनी हे धरण भरल्याची घोषणा केली होती. मात्र असे घडले नाही. दरम्यान पावसाने ओढ दिली आणि धरणाच्या लाभक्षेत्रात आवर्तन सोडण्याची मागणी झाली. त्यामुळे तालुक्‍यात विनोदी चर्चा सुरू झाली होती. धरण भरण्यापूर्वी आवर्तन सुरू होणे म्हणजे धरणाचा साठा कमी करणे होते. त्यात गेले 15 दिवस वरूणराजाने डोळे वाटारल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र गेले चार ते पाच दिवस धरणाच्या पाणलोटात पावसाच्या सरी चांगल्या कोसळू लागळ्या.

शिवाय रतनवाडी, घाटघर व कळसूबाईचे कडे व ओढे नाले यांना फुटलेले पाणी धरणाकडे येणाऱ्या नवीन पाण्यात भर घालू लागले. त्यामुळे आवक वाढली. त्यामुळे हे धरण गेले 3 दिवस पाणी पातळीच्या दृष्टीने भराभरा फुगत गेले. त्यात धरणातून वीज निर्मितीसाठी व आवर्तनासाठी रिते होत राहिले. मात्र निसर्गाच्या लहारीपणामुळेच धरण आज दुपारी तांत्रिकदृष्ट्या भरले. धरण 10 हजार 500 दलघफू पाणी पातळीवर पोचल्यावर सहायक कार्यकारी अभियंता रामनाथ आरोटे यांनी कार्यकारी अभियंता देशमुख यांना हे वृत्त दिले. लगेचच धरण भरल्याची घोषणा देशमुख यांनी केली.

एक हजार क्‍युसेकचा विसर्ग..

भंडारदरा धरणाच्या टनेलमधून 819, स्पीलवे व अंब्रेला फॉल असा सर्व मिळून 1 हजार क्‍युसेकचा विसर्ग निळवंडे धरणात सोडला जात आहे. तर निळवंडे धरणातून 1 हजार 550 क्‍युसेकचा विसर्ग प्रवरा नदी पात्रात आवर्तनासाठी सोडला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)