खबरदार, सार्वजनिक ठिकाणी थुंकाल तर!

घाण केल्यास, थुंकल्यास, लघुशंका, शौच केल्यास आता जागेवरच दंड

पुणे – सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास, थुंकल्यास, लघुशंका केल्यास किंवा शौच केल्यास जागेवर दंड आकारण्याला महापालिकेने सुरूवात केली होतीच; मात्र शुक्रवारी महापालिकेने वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नागरिकांना कळवले आहे. या नोटीशीत दंडाची रक्कमही नमूद करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेतर्फे कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी स्वत:च्या विभागाचे एक आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक अशी एकूण 16 पथके तैनात केली आहेत. या पथकाद्वारे रस्त्यावर थुंकणाऱ्या सुमारे शंभर जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अचानकपणे ही कारवाई सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. त्यामुळे याविषयी लोकांना समजावे यासाठी ही जाहीर नोटीस देण्यात आली आहे. अजूनही ही कारवाई सुरू आहे.

केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे आठ एप्रिल 2016 ला घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियम करण्यात आला होता. या नियमाची प्रभावीपणे शहरात अंमलबजावणी करण्याला सुरूवात झाल्याचे नोटीशीद्वारे कळवण्यात आले आहे.
या नियमांचे पालन न केल्यास शासननियमाप्रमाणे व्यक्ती आणि संस्थांना दंड आकारण्यात येणार आहे. हे दंड वसुलीचे अधिकार नगरपरिषदा, नगरपंचायत, स्थानिक स्वराज्यसंस्थांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसारच महापालिका कार्यक्षेत्रात या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे.

रस्ते आणि मार्गावर घाण केल्यास जागेवर 180 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये दंड, उघड्यावर लघवी/लघुशंका केल्यास दोनशे रुपये दंड आणि उघड्यावर शौच केल्यास तब्बल पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी करायच्या असल्यास दंडाची रक्कम नागरिकांना खिशातच घेऊन फिरावी लागणार आहे. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)