#Betterindia: शक्‍कल मातीच्या बाटलीची 

– जगदीश काळे

प्रवासात, कॉलेजमध्ये किंवा कार्यालयात असताना बहुतांशी मंडळी पाण्याची बाटली जवळ ठेवतात. कारण घराबाहेरच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत सर्वच जण सांशक असतात. म्हणून स्वत:च्या घरून ऍक्वागार्डचे किंवा उकळलेले पाणी नेणेच पसंत करतात. एकीकडे स्वच्छ पाण्याबाबत सर्व मंडळी जागरुक असताना दुसरीकडे प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळे तूमकूरच्या एका तरुणाने यावर उपाय शोधत इकोफ्रेंडली बाटली तयार केली असून त्यामुळे पाणी शुद्ध आणि थंडगार राहतेच त्याचबरोबर पर्यावरणाला देखील बाधा पोचत नाही. मातीपासून आणि हाताने तयार होणाऱ्या बाटलीवर संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया होते. प्लास्टिकच्या बाटलीला पर्याय म्हणून ही बाटली उपयुक्त मानली जाते.

मातीच्या बाटलीचा शोध लावणाऱ्या युवकाचे नाव प्रमोद सिद्धगणगैय्या असून तो कर्नाटकातील तूमकूरचा रहिवासी होय. पर्यावरणाची हानी थांबावी आणि रोजगारासाठी गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर थांबावे यासाठी मातीपासून बाटली तयार करण्याची अनोखी शक्कल लढवली. थंडगार पाणी राहण्यासाठी माठ जसा उपयुक्त ठरतो त्याचप्रमाणे बाटलीही मातीपासून तयार करावी, असा विचार प्रमोदच्या डोक्‍यात आला. उन्हाळ्याच्या दिवसात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी गरम होते आणि ते शरिराला अपायकारक असते.

याउलट माठाप्रमाणेच बाटली तयार केली तर शरिराला थंडावा मिळेलच तसेच कोणताही अपाय होणार नाही, या दृष्टीने प्रमोदने इकोफ्रेंडली बाटलीचा विचार केला.

2015 मध्ये प्रमोदला मातीच्या बाटलीची कल्पना सुचली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माठ नेणे अवघड असते. यामागची दोन कारणे ते म्हणजे त्याचा आकार आणि ठेवण्यासाठी लागणारी जागा. तसेच थोडाही धक्का लागल्यास फुटण्याचीच भीती अधिक असते. पाण्याने भरलेला माठ उचलणे हे देखील कठीण असते. या सर्व गोष्टीचा इंजिनिअर असलेल्या प्रमोदने विचार केला. मातीला कंटेनरचा आकार दिला तर त्याचा वापर करणे सोपे जाईल, असे निदर्शनास आले.

वजन कमी आणि बाळगणेही सोपे असल्याने कंटेनरप्रमाणेच मातीच्या बाटलीची रचना करण्याचे ठरवले. मातीचे तोंड असल्याने कंटेनरबाहेर पाणी सांडण्याची शक्‍यता अधिक होती. त्यामुळे कंटेनरच्या तोंडाला रबराचा वापर करून त्यावर प्लास्टिकचे झाकण वापरले. तुमकूर येथे उभारलेल्या लहान कारखान्यात मातीच्या कंटेनरची निर्मिती होऊ लागली. याठिकाणी प्रमोदने स्थानिक कारागिरांना रोजगार दिला. त्यांना बाटलीची निर्मिती कशी करायची याबाबत प्रशिक्षण दिले. प्राचीन भारतीय जीवनपद्धतीत मातीच्या भांडीचाच वापर केला जात होता. त्यावेळी स्टिल किंवा जर्मन अस्तित्त्वात नव्हते. कालांतराने शोध लागला.

प्रमोदने प्राचीन भारताच्या कलेपासूनच प्रेरणा घेत मातीची बाटली तयार केली. जेव्हा या बाटलीला काय नाव द्यावे, असा जेव्हा विचार आला तेव्हा गुगलवर अशा प्रकारच्या भांड्याला “अपाह’ असे नाव आले. हा संस्कृत शब्द आहे. प्रमोदने आपल्या उत्पादनाला हेच नाव निश्‍चित केले.ही बाटली अतिशय दणकट आणि टिकावू असून सायकल स्टॅंडला अडकवून तिचे वहन करता येणे शक्‍य आहे. त्यामुळे तिच्या टिकाऊपणाबद्दल सांशकता व्यक्त करण्याचे कारण नाही, असे प्रमोद आत्मविश्‍वासपूर्वक सांगतो. एक अपाह बाटली तयार करण्यासाठी 399 रुपये खर्च येतो. मातीची बाटली आणि झाकण याचा खर्च अनुक्रमे 210 आणि 189 रुपये येतो. त्यामुळे सुमारे चारशे रुपये ही किमान किंमत असल्याचे प्रमोद म्हणतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)