बलिदान दिन- उत्तम प्रशासक, स्वराज्यरक्षक : छ. संभाजी महाराज

साईप्रसाद कुंभकर्ण

ज्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा छत्रपती संभाजीराजांनी निद्रेचे चार तास सोडले तर सतत 20 तास अखंड जीवन स्वराज्य रक्षणासाठी घालविले. छत्रपती संभाजीराजांचे जीवन हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ व सूर्यासारखे प्रखर तेजस्वी होते. अशा स्फटिकनिर्मळ राजांचे जीवनचरित्र सर्वांनीच आचरणात आणायला हवे.

संभाजीराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी महाराणी सईबाई यांच्या पोटी झाला सईबाईंचे 5 सप्टेंबर 1659 रोजी निधन झाले आणि संभाजीराजांचे मातृछत्र हरपले. तेव्हा कापूरहोळ येथील धाराबाई गाडे यांना युवराज संभाजीराजांच्या दूध आई म्हणून गडावर आणले.

राजमाता जिजाऊंनी व सर्व सावत्र मातांनी संभाजीराजांना अगदी जीवापाड जपले. जिजाऊंनी संभाजीराजांना संस्कृत, मराठी, हिंदी व इतर भाषा आणि युद्धकलेचे शिक्षण दिले. त्यामुळेच संभाजीराजे बालपणी संस्कृत पंडित व उत्तम योद्धा म्हणून नावलौकिकास पावले.

वयाच्या आठव्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजे राजकारणात आले. दिलेरखान व जयसिंगाशी छ. शिवरायांनी केलेल्या पुरंदरच्या तहाच्या पूर्ततेसाठी व उर्वरित स्वराज्य रक्षणासाठी आठ-साडेआठ वर्षाच्या संभाजीराजांना मोगलांकडे ओलीस रहावे लागले. राजमाता जिजाऊंच्या संस्कृत शिक्षणाचा परिणाम संभाजीराजांवर झालेला असल्याने राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी “बुद्धभूषण’ नावाच्या संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली. तसेच “नख शिख’, “नायिका भेद’ व “सात सतक’ हे तीन ग्रंथ लिहिले. बालवयातच ग्रंथ लेखन करणारे संभाजी महाराज हे प्रतिभावंत लेखक होते .

संगमेश्‍वर येथे कैद केलेल्या संभाजी महाराजांना 15 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाच्या बहादूरगड छावणीत धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र संभाजी महाराजांनी औरंगजेबाला भिक घातली नाही. संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना मृत्युदंड देण्यात आला.

सात लाख मोगली सेना विरुद्ध मुठभर मराठे; 63 वर्षाचा कुटील औरंगजेब व त्याविरुद्ध 24 वर्षाचे छत्रपती संभाजीराजे; शक्तिशाली मोगली सामर्थ्य आणि तीन चार जिल्ह्यांइतके स्वराज्य असा विषम लढा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रात नऊ वर्ष सुरू ठेवला.

रामशेज किल्ल्याच्या पराभवाने चिडलेल्या औरंगजेबाने “जोपर्यंत संभाजीराजांना पकडणार नाही तोपर्यंत डोक्‍यावर पगडी घालणार नाही,’ अशी प्रतिज्ञा केली होती. असे होते संभाजीराजांचे कर्तृत्व.

अशा स्वराज्यरक्षक, पराक्रमी आणि निर्व्यसनी राजावर जे आरोप झाले जो चुकीचा इतिहास लिहिला गेला, सांगितला गेला ती ऐतिहासिक प्रतारणा दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीराजांचे बलिदान स्थान आत्ताच्या तरुण पिढीचे स्फूर्तिस्थान होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
देश धर्म पर मिटनेवाला
शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी महाप्रतापी
एक ही शंभूराजा था ।।

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)