बंगालची वाघीण चिंतेत

– सरोजिनी घोष 

बारीक किनार असलेली पांढरी साडी आणि हवाई चप्पल घालणाऱ्या ममता बॅनर्जी यांना बंगालची वाघीण म्हटले जाते. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंब चालवण्याकरिता दूध विक्रीचे काम ममतांनी केले. परिस्थितीने निर्माण केलेल्या आव्हानांमुळे त्या कणखर बनत गेल्या. 1993 सालामध्ये एका बलात्कार पीडितेला न्याय देण्याच्या प्रयत्नात त्यांना रायटर्स इमारतीतून जबरदस्तीने हाकलून दिले गेले. तेव्हा या इमारतीत मुख्यमंत्री बनूनच पाऊल टाकेन अशी शपथ त्यांनी घेतली. ममतांनी “मां, माटी, मानुष’ नारा लावत पश्‍चिम बंगालमध्ये सीपीएमच्या सरकारविरोधात संघर्ष सुरू केला आणि घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली. राष्ट्रीय राजकारणात अनेकदा ममता दीदी एनडीएबरोबर गेल्या तर काही प्रसंगी त्यांनी युपीएची कासही धरली.

खासगी आयुष्य : 
ममतांचा जन्म 5 जानेवारी 1955 रोजी कोलकातामध्ये झाला. त्या कायद्याच्या पदवीधर असून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. ममता बॅनर्जी या 1970 च्या दशकामध्ये विद्यार्थी चळवळीच्या राजकारणात आल्या. 1976 मध्ये त्या पश्‍चिम बंगालमध्ये महिला कॉंग्रेसच्या महासचिव बनल्या. पुढे 1984मध्ये ऑल इंडिया यूथ कॉंग्रेसच्या महासचिव झाल्या. त्याच वर्षी आठव्या लोकसभेतील सर्वात तरुण संसद सदस्य बनल्या. त्यावेळी त्यांचे वय 29 वर्षे होते. 1990 मध्ये पश्‍चिम बंगाल युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. पुढे 1997 मध्ये कॉंग्रेसपासून वेगळे होत त्यांनी तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. 1999 च्या निवडणुकीत कोलकाता (दक्षिण) विभागातून त्या तृणमूलच्या आमदार म्हणून निवडून आल्या. 2011 हे साल ममतांच्या आयुष्यात ऐतिहासिक ठरले. यावर्षी त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये 34 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या सीपीएम पक्षाचा पराभव करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

तत्पूर्वी ममता 1991 ते 1993 अशी तीन वर्षे केंद्रात मानव संसाधन विकास मंत्री होत्या. एनडीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री, कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. युपीए-2 च्या सरकारमध्येही त्या रेल्वेमंत्री होत्या. 1991 पासून 2009 पर्यंत सहा वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा मान त्यांच्याकडे जातो.

2014 मध्ये देशभरात मोदी लाट असतानाही त्यांच्या तृणमूल कॉंग्रेस या पक्षाने 42 पैकी 34 लोकसभा जागा जिंकल्या होत्या. यावरून त्यांची पश्‍चिम बंगालच्या राजकारणावरील पकड लक्षात येते. 2014 पासून ममता दीदी ट्‌वीटरवर सक्रिय असून आज त्यांचे 23 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

गेल्या काही महिन्यांतील त्यांची राष्ट्रीय राजकारणातील सक्रियता पाहता त्यांची नजर आता दिल्लीकडे असल्याचे दिसते. पण यावेळी मात्र त्यांना आपला गड राखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. याचे कारण भारतीय जनता पक्ष सर्व ताकदीनिशी बंगालमध्ये आपले पाय रोवण्याचे प्रयत्न ताकदीने करत आहे. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला मजबूत नेता असल्याचे सिद्ध करण्यासाठी ममतांना राज्यामध्ये भाजपचा वारू रोखण्याची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)