घरकुल योजेनेच्या लाभार्थ्यांना मिळेना वाळू

मोफत पाच ब्रास वाळूचा निर्णय कागदावरच?

नितीन राऊत
वडूज – प्रधानमंत्री आवास योजनेला मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा शासन निर्णय झाला असला तरी मंजूर घरकुल योजनेतील लभार्थ्यांना अद्यापही वाळू उपलब्ध झाली नाही. वडूज नगरपंचयतीने याबाबत तहसील कार्यालयात उपलब्ध असलेला वाळू साठा मंजूर घरकुल लाभार्थ्यांना द्यावा, अशी मागणी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी’लोकसंवाद’कार्यक्रमात केली होती व यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सूचना देण्यात येतील. या योजनेतील घरांच्या आराखड्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. यांनतर परिपत्रक काढूनही स्थानिक पातळीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेला मोफत ब्रास वाळू मिळणार का असा प्रश्‍न लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. खटाव तालुक्‍यात प्रधानमंत्री आवास योजनेत अनेक प्रकरणे मंजूर आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी ब्रास वाळू मोफत मिळणार असल्याने महसूलकडे विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अजूनही महसूल कडून म्हणावे असे समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

सध्या खटाव तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल व पोलीस विभागाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली होती. यामुळे सध्या तालुक्‍यात वाळू उपसा थंडावला आहे. नुकताच खटाव महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळूचा साठा तहसील कार्यालयात पडून आहे. यामुळे जप्त केलेली वाळू लाभार्थ्यांना द्यावी अशी मागणी होताना दिसते. तालुक्‍यात कुठेही लिलाव नसल्याने शासकीय व खाजगी व्यावसायिक कामांना वाळू उपलब्ध होत नसल्याने तुटवडा जाणवत आहे.

यामुळे घरकुल योजनेसाठी मिळणाऱ्या मोफत ब्रास वाळूसाठी काही लाभार्थी प्रतीक्षेत असल्याचे दिसते. वडूज नगरपंचायतीच्या हद्दीत प्रधानमंत्री योजनेतून अनेक प्रकरणे मंजूर आहेत. मात्र सध्या वाळू अभावी ही सर्व कामे रखडलेली आहेत. महसूल विभागाने याबाबत त्वरित वरिष्ठांकडून माहिती घेऊन लाभार्थ्यांना याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

नगरपंचायतीचा उल्लेख नाही : प्रांताधिकारी

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पाच ब्रास झिरो रॉयल्टीने वाळू द्यावी, असे परिपत्रक असताना नगरपंचायतीच्या माध्यमातूनही अनेक प्रधानमंत्री आवास योजनेची प्रकरणे मंजूर आहेत. याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता नगरपंचायतचा परिपत्रकात उल्लेख नाही. फक्त गटविकास अधिकारी यांच्याकडून मागणी आल्यास देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

आव्हाड यांचा पाठपुरावा

तत्कालीन तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. लाभार्थ्यांना याबाबत त्यांनी माहिती ही दिली होती. मात्र नूतन तहसीलदार अर्चना पाटील याबाबत पाठपुरावा करून लाभार्थ्याचा वाळूचा प्रश्‍न मार्गी लावणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)