पोलिसांनी केले मुले, पालकांचे समुपदेशन : अजाणतेपणी गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याची कबुली
पुणे – मागील काही वर्षांत शहरातील बालगुन्हेगारी हे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरले होते. विशेषतः खून, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमध्येही बालगुन्हेगारांचे प्रमाण मोठे दिसत होते. या बालगुन्हेगारांना भरोसा सेलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. या बालगुन्हेगारांच्या समुपदेशनादरम्यान अजाणतेपणी गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या हातून गुन्हे घडले असल्याचे समोर आले.
शहरात बालगुन्हेगारीकडे वळलेल्या 457 विधीसंघर्षित बालकांना (बालगुन्हेगार) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आणि पालकांचे समुपदेशन करण्यात आले. गुन्हेगारी मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी, चांगले मित्र, शिक्षण याचे महत्त्व सांगण्यात आले. तर, त्यांच्या पालकांना राहणीमानात सुधारणा करण्याबरोबरच व्यसनाधिनता टाळण्याचे सांगण्यात आले. भरोसा सेल अंतर्गत विशेष बाल रक्षा पथकाकडून ही कार्यवाही करण्यात आली.
शहरात बालगुन्हेगारीमध्ये वाढ होत चालली आहे. मागील 3 वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये 1,200 पेक्षा जास्त बालगुन्हेगारांचा सहभाग असल्याचे आढळले होते. बालगुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त न केल्यास हेच बालगुन्हेगार नंतर अट्टल गुन्हेगार बनतात. त्यामुळे पुणे पोलिसांच्या भरोसा सेलमधील विशेष बाल सुरक्षा पथकाकडून बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार पथकाच्या निरीक्षक शिल्पा चव्हाण, उपनिरीक्षक बाळासाहेब भोर, पोलीस हवालदार शरद देडगे, अविनाश पवार, जर्नादन केदार, उमेश आटोळे, विजय देशमुख, मयुर दळवी यांच्या पथकाने शहरातील विविध पोलिस ठाण्यात जाऊन बालगुन्हेगारांचे समुपदेशन केले. त्यासाठी त्यांना लाइफ फाउंडेशन या संस्थेचे नरेन घोडियाल, समुपदेशक अमित वरदे, पंकज पिपाडा, डॉ. प्रीती पुरोहित, नरेश गांधी, राजेश शेट्टी, पंख फाउंडेशनचे स्मिता आपटे, मीना चितळे, ज्योती काटीकर, श्वेता सूर्यवंशी यांची मदत झाली.
घेतल्या तब्बल 25 बैठका
पोलीस व सामाजिक संस्थांनी पोलीस ठाण्यांमध्ये 25 बैठका घेतल्या; तर सहायक आयुक्त यांच्या स्तरावर 9 बैठका घेण्यात आल्या. यामध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 457 बालगुन्हेगार आणि त्यांच्या पालकांचे देखील समुपदेश केले. बालकांना बालगुन्हेगारीपासून रोखण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती पालकांना देण्यात आली.
व्यसनांचेही प्रमाण जास्त
अल्पयीन मुलांमध्ये व्यसनांचेही प्रमाण जास्त दिसत आहे. दारू, गांजा, बिअर , सिगारेट, तंबाखू अशा व्यसनांच्या आहारी ही मुले गेलेली दिसतात. मागील काही दिवसांत पालक स्वत: अशा व्यसनी मुलांना भरोसा सेलमध्ये घेऊन आले आहेत. त्यांना व्यसनमुक्ती केंद्रामार्फत औषधे सुरू करण्यात आली आहेत. Child Criminals