दाखल गुन्हा घेतला मागे

महापालिकेकडून पोलिसांना पत्र
पुणे –
विद्यार्थ्यांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे शाळेमधून काढल्यामुळे शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ऍमेनोरा शाळेविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश दिल्याने हा गुन्हा मागे घेण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मिळाल्यानंतर पालिकेने हडपसर पोलिसांना यासंदर्भात पत्र पाठविले.

ऍमनोरा स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या 200 मुलांचे शैक्षणिक शुल्क पालकांनी पूर्ण भरलेले नव्हते. त्यामुळे शाळा प्रशासनाने या मुलांना शाळेमधून काढले होते. शाळा प्रशासनाने आरटीई 2009 (शिक्षण हक्‍क कायदा)च्या कलम 16 व 17 चा भंग केल्याचा आरोप करत पालकांनी आंदोलन उभे केले होते. तसेच, शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात बुधवारी (दि.22) शिक्षण उपसंचालकांनी महापालिकेला पत्र पाठवित शाळा प्रशासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम 2011 मधील आणि आरटीई कायद्यासह जे. जे. कायद्यामधील कलम 75 आणि 82 या तरतुदींचा भंग केल्याचे पत्रामध्ये नमूद केले होते.

यापूर्वीच्या चौकशी अहवालाच्या आधारे शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापिका यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाला दिले होते. त्याअनुषंगाने रितसर कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी सहायक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे यांना प्राधिकृत केले होते. त्यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हडपसर पोलिसांना पत्रव्यवहारही केला. परंतु, अवघ्या एका दिवसांत शाळा प्रशासनाने पालकांसमोर झुकती बाजू घेत मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला. तसे लेखी पत्र शाळेने दिल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला पुन्हा पत्र पाठवित हा गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुलांचे प्रवेश सुरळीतपणे पूर्ववत केल्याने शाळेवरील गुन्हा दाखल करण्याची मूळ तक्रार निकाली काढण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करू नये, असे आदेशात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने पोलिसांना पत्र पाठवून गुन्हा दाखल करू नये, असे कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)