पाचव्या दिवशी झाला निर्णय ः पूर्वीच्याच जागी मंडई भरणार; तिघे उपचारासाठी दाखल
कराड – भाजी मंडईसाठी दिलेल्या जागेवर बिल्डर व प्लॅट मालकांनी पार्किंग केल्याने भाजी मंडईचा प्रश्न निर्माण झाला होता. सदरची जागा नगरपरिषदेने मोकळी करून शेतकरी व व्यापारी यांना द्यावी, या मागणीसाठी सोमवारपासून मलकापूर भाजी मंडई संघर्ष समितीतील सहा कार्यकर्ते उपोषणास बसले होते. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण स्थळावरुन न हालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याने शुक्रवारी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले.
दरम्यान, उपोषणास बसलेल्यापैकी तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राजू मुल्ला व उपोषणकर्ते राजू जाधव, मुन्ना आतार, विशाल कसबे, मोहसीन पठाण यांच्यात नगरपरिषद दालनात चर्चा झाली. यावेळी नगरपरिषदेने संघर्ष समितीच्या मागण्या मान्य असल्याचे सांगितल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपस्थितांचे हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबूसरबत देण्यात येवून उपोषण सोडण्यात आले.
मलकापूर येथे शेतकऱ्यांसाठी असलेल्या भाजी मंडईत जागा अडवणूक होत असल्याच्या तक्रारी दिवसेदिवस वाढत चालल्या होत्या. एका बाजूला हा वाद सुरू असताना दुसरीकडे नगरपरिषदेने भाजी मंडईसाठी स्वतंत्र जागा घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून यावर सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली. मात्र यावर तोडगा न निघाल्याने भाजी मंडई संघर्ष समितीच्या सदस्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला उपोषणाच्या चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना नगरपरिषदेने दिलेली जागा मोकळी करून देण्याचे आदेश दिले.
तसेच प्रशासन आणि पदाधिकारी यांनी भाजी मंडईचा प्रश्न ऐवढे दिवस निकालात न निघता या गोष्टीवर शेतकऱ्यांना उपोषण करावे लागायला नको होते, अशी खंत व्यक्त केली. प्रश्न मार्गी लागल्याने मंडई पूर्ववत भरणार आहे. अखेर उपोषणाच्या पाचव्या दिवशी भाजी मंडई संघर्ष समितीच्या मागण्या मान्य केल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी राजू जाधव, कुमार माने, मनीषा कचरे, विनोद कांबळे, मंगल कचरे, मुन्ना आत्तार तसेच भाजी मंडई संघर्ष समितीचे सर्व सदस्य, व्यापारी उपस्थित होते.