महापालिकेच्या महामेट्रोला सूचना
पुणे – महामेट्रोकडून नदीपात्रात सुरू असलेल्या कामासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री ठेवण्यात आली असून या कामासाठी काही ठिकाणी राडारोड्याचे भराव टाकण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे भराव तसेच राडारोडा काढून घ्यावा, अशा सूचना महापालिकेकडून महामेट्रोला करण्यात आला आहेत. महामेट्रो आणि महापालिकेच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गांचा बहुतांश भाग नदीपात्रातून जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोकडून नदीपात्रात खांबाचे फाऊंडेशन घेतले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. हे काम आधी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक ते महापालिका भवनापर्यंत सुरू होते. मात्र, मागील चार महिन्यांपासून धान्य गोदाम ते रामवाडी मार्गाचे कामही सुरू करण्यात आले असून या कामाचा काही भाग संगमवाडी नदीपात्रात आहे. हे काम करताना महामेट्रोला भराव टाकून नदीत कच्चा रस्ता करावा लागला आहे. पावसाळ्यात अशाप्रकारे टाकलेला भराव तसेच खोदण्यात आलेला राडारोडा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पावसाळ्यापूर्वी हे राडारोडा काढण्याचे काम करण्याच्या सूचना महामेट्रोला केल्या आहेत. या शिवाय, महामेट्रोचे बरेचशे लोखंडी साहित्य आणि यंत्रसामुग्री तसेच कामगारांसाठी नदीतच काही ठिकाणी तात्पुरती शेड उभारण्यात आली असून त्यामुळे प्रवाहाला अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही स्थितीत हे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.