आई होताना…

मातृत्व! ही नुसती कल्पनाच किती सुंदर असते. मातृत्व हे एका स्त्रीला परिपूर्ण बनविते. गर्भावस्था; हा स्त्री जीवनातील अत्यंत नाजूक तसेच विलक्षण कुतूहलाचा काळ असतो. हा काळ म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदानच. एखादी स्त्री गर्भार राहिल्यापासून तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेले असते आता ती केवळ स्त्री नसते तर आई होण्याकडे तिची वाटचाल सुरू झालेली असते. आता तिचे आयुष्य हे फक्त तिचे राहिलेले नसते.

स्त्रीचे गर्भातील बाळाबरोबर एक सुंदर, अतूट नाते हे गर्भधारणेच्या वेळेपासूनच सुरू झालेले असते. तिच्या शरीराबरोबरच तिच्यात असंख्य मानसिक व भावनिक बदल झालेले असतात; हार्मोन्सच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली असते आणि त्यातून पहिलटकरीण असल्यास तिला या बदलांचा प्रत्यय तीव्रतेने जाणवतो. एकीकडे आई होणार या गोष्टीचा गगनात मावेनासा आनंद तर दुसरीकडे ते आईपण पेलविण्याबाबतची हुरहूर, शंका व एक जबाबदारीची जाणीव, अशा असंख्य भावनांच्या वाटांवरून तिचे मन सध्या प्रवास करीत असते..

याच वेळी स्त्रीला एक वेगळाच अनुभव यायला सुरुवात होते; तो म्हणजे हळवेपणाचा.. स्त्री या काळात प्रचंड हळवी होते.. या काळात स्त्रीने जाणीवपूर्वकरीत्या आपल्या मनाला नकारात्मकतेचा स्पर्श न होऊन देता आपल्यातील सकारात्मक विचार टिकवून ठेवणे गरजेचे असते. या काळात मातेच्या सभोवतालचे वातावरणही आनंदी व आरोग्यदायी असणे अत्यंत गरजेचे असते कारण मातेच्या विचारांचा तसेच आजूबाजूच्या परिस्थितीचा गर्भावर परिणाम होत असतो.

या काळात होऊ घातलेल्या मातेने योग्य आहार-विहार, व्यायाम, सकारात्मक विचार व वाचन या गोष्टींची सांगड घातल्यास त्याचा गर्भावर चांगला परिणाम होतो. याचबरोबर इतर कोणत्याही भाषांपेक्षा गर्भाला संगीताची भाषा ही लवकर समजत असल्याने, गर्भाला तसेच मातेला आनंदी, शांत, उत्साही वाटेल असे सौम्य संगीत गर्भावस्थेत मातेने ऐकल्यास उत्तम.. याचबरोबर या काळात स्त्रियांनी पुरेशी झोप व विश्रांती घेणेही अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच मातेने आपल्या आणि बाळाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य असा दिनक्रम आखल्यास व कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता परंतु शक्‍य तितक्‍या प्रमाणात तो पाळल्यास प्रसुतिपश्‍चात तिला याचा निश्‍चितच फायदा होतो..

तसेच शक्‍य असल्यास या काळात होऊ घातलेल्या मातेचे व तिच्या बाळाचे कोड कौतुक करून या स्त्रीला काय हवे नको याची दखल घेऊन तिला खाव्याशा वाटणाऱ्या पदार्थांची रेलचेल करणारा असा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केल्यास या स्त्रीच्या आजूबाजूचे वातावरण उत्साही व आनंदी तर होतेच परंतु तिला व तिच्या पोटातील बाळाला यातून सकारात्मकता मिळायला निश्‍चितच मदत होते..

गर्भावस्थेतील पहिले तीन महिने हे स्त्रीसाठी शारीरिक तसेच मानसिकरीत्या अत्यंत नाजूक असतात, पहिल्या तिमाहित आनंदी, धडधाकट राहिल्याने या भावी मातेचा प्रसूतीपर्यंतचा काळ अत्यंत सुलभ होतो.
संपूर्ण गर्भावस्थेच्या कालावधीत प्रत्येक स्त्री हे दोन जीवांचे आयुष्य जगत असते त्यामुळे या कालावधीत तिने तिचे आयुष्य द्विगुणित व भरभरून जगले पाहिजे.

जिवेत शरदः शतम्‌ ।।

– मृणाल घोळे मापुस्कर (लेखिका क्‍लिनिकल सायकॉलॉजीस्ट आहेत) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)