राष्ट्रवादीच्या ‘त्या’ 18 नगरसेवकांची बडतर्फची कारवाई मागे !

अहमदनगर: लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय नेते रुसवे-फुगवे विसरतात हे दिसून आले आहे. अहमदनगर महानगर पालिकेत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना बडतर्फ केले होते. मात्र आज त्या 18 नगरसेवकांची बडतर्फची कारवाई मागे घेण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

काय होते प्रकरण ?

गेल्या महिन्यात 28 डिसेंबर रोजी नगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना मतदान केले होते. त्यामुळे हाती संख्याबळ नसतानाही भाजपने पालिकेची सत्ता खेचून राजकीय चमत्कार घडवून आणला. पक्षाच्या आदेशाला हरताळ फासण्याच्या नगरसेवकांच्या कृतीची पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली होती. पवार यांनी नगरमध्ये जाऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवकांना “कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती.

महापौर निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावलण्यात आला. याबद्दल आपले म्हणणे सात दिवसात मांडावे, अशी सूचना राष्ट्रवादीने नगरसेवकांना केली होती. मात्र, नोटीस बजावूनही कोणताही खुलासा न करण्यात आल्याने जयंत पाटील यांनी नगरसेवकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच नगरसेवकांसह नगरच्या जिल्हाध्यक्षांवरही कारवाई केली होती. जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा न केल्याने पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)