धीर धरा, प्रगती करा

व्यक्‍तिमत्त्व 
सागर ननावरे 
धीर, संयम, सबुरी हे तिन्ही एकाच अर्थाचे शब्द. जे आपल्याला वेळोवेळी कामी येत असतात
आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर संयम असायलाच हवा. कारण शेवटी यश हे आपल्या प्रयत्नावर जेवढे अवलंबून असते तेवढेच आपल्यामधल्या संयमावरही अवलंबून असते. आपल्याला आयुष्यात यश हवे असते आणि ते यश मिळविण्यासाठी आपण त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात करतो; परंतु आपल्या प्रयत्नांत अनेक अडथळे येतात, अपयश येते आणि मग आपण परिस्थितीसमोर हार मानून, किंबहुना धीर सोडून देऊन प्रयत्न करणेच सोडतो आणि मग इतर कोणी तरी आपल्या कष्टाला त्याच्या बुद्धीची जोड देऊन यश मिळवतो आणि आपण मात्र याची सुरुवात मी केली होती; परंतु यश नाही मिळाले. हे सांगण्यातच समाधान मानत बसतो.
याबाबत वाचनात आलेली एक ग्रामीण कथा मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते. 
फार पूर्वी एका दुष्काळग्रस्त गावात एका शेतकऱ्याने आपल्या शेतीला पाणी मिळावे यासाठी गावच्या जमिनीत विहीर खोदायला सुरुवात केली. घाम गाळून, दिवसरात्र एक करून तो खड्डा खोदू लागला. दोन तीन दिवस सलग तो खड्डा खोदत होता. पाहता पाहता जवळपास आठ-दहा फुटांचा खड्डा त्याने खोदला; परंतु काही केल्या त्याला त्यात पाणी लागण्याची चिन्हे दिसेनात. मग त्याने स्वतःच्या मनाची समजूत काढली. या जागेवर पाणी लागण्याची शक्‍यताच नाही त्यामुळे वेळ आणि श्रम व्यर्थ घालविण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे धीर सोडून देऊन त्याने त्या खड्ड्याचे काम अर्धवट सोडून दिले आणि तो दुसरीकडे जागा शोधू लागला.
त्या खड्ड्यापासून काही मैलांच्या अंतरावर त्याने दुसरा खड्डा खोदण्याची योजना आखली. त्याठिकाणी पाणी लागेलच अशी खात्री त्याला वाटू लागली. मग त्याने आपली अवजारे घेऊन त्याठिकाणी पुन्हा नव्याने खड्डा खोदायला सुरुवात केली.
पुन्हा त्याने अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या कामास प्रारंभ केला. याठिकाणी पाणी अवश्‍य लागणार याची त्याला आशा होती. दररोज खड्डा खोदण्याचा त्याचा दिनक्रम चालूच होता. तीन दिवस उलटले आता हा खड्डा पूर्वीच्या खड्ड्यापेक्षा अधिक खोल म्हणजेच जवळपास बारा-तेरा फुटांचा झाला होता. मात्र, एवढे होऊनही त्या खड्ड्याला पाणी लागले नव्हते. आता मात्र तो शेतकरी पूर्णपणे निराश झाला आणि हताश होऊन पाणी लागण्याची आशा सोडून घराकडे निघून गेला.
काही दिवसांनी त्या गावातील दुसऱ्या एका शेतकऱ्याने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि त्याने पहिल्या शेतकऱ्याने जो बारा-तेरा फुटांचा खड्डा खोदला होता त्यालाच अजून खोलवर खोदण्यास सुरुवात केली.
पहिल्या शेतकऱ्याने त्याला पाहिले आणि त्याला समजावले “कशाला शक्ती वाया घालवतोस मी बारा-तेरा फुटांचा खड्डा खोदला पण त्याला पाणी लागले नाही. मात्र, या दुसऱ्या शेतकऱ्याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपले काम तसेच चालू ठेवले आणि काय आश्‍चर्य त्याने बारा-तेरा फुटांच्या त्या खड्ड्याला अजून दोन-तीन फूट खोदले आणि त्याला त्या खड्ड्यात पाणी लागले. आता हे पाहून पहिला शेतकरी मात्र विचारात पडला. त्याने दुसऱ्या शेतकऱ्याला विचारले तू हे कसे सहज शक्‍य केलेस?
त्यावर तो दुसरा शेतकरी म्हणाला, “मी काहीच केले नाही तू यशाच्या जवळ जाऊन धीर सोडलास आणि मात्र माझ्या कष्टाला आशेचा धीर जोडला.”
पहिल्या शेतकऱ्याच्या लक्षात आले की आपण शेवटपर्यंत त्या जामिनीत घाव घातले; परंतु शेवटचा आणि महत्त्वाचा घाव घालण्यापर्यंत धीर धरला नाही.
मित्रांनो, आपलेही बरेचदा असेच होत असते. आपण ध्येय उराशी बाळगून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात करतो. प्रयत्न करीत असताना एक वेळ अशी येते, की जिथे काही नकारात्मकता आपल्या मनात येते. ज्यामुळे ‘आपण हे करू शकत नाही.’ असे मनोमनी ठरवून आपण आपला धीर सोडून देत असतो. परिणामी आपण अपयशाच्या खोल गर्तेत स्वतःला झोकून देत असतो.
थोडक्‍यात काय, तर कोणत्याही कार्याला तडीस नेण्यासाठी आपल्याला त्याप्रती धीर/संयम पाळायला हवा. धीर सोडून काम अर्धवट सोडल्यास आज ना उद्या कोणी तरी ते काम पूर्णत्वास नेऊन त्याचे श्रेय नक्कीच घेणार आहे. म्हणूनच यश मिळविण्यासाठी गरज आहे ती धीर धरण्याची, संयमाची. कोणी तरी म्हटले आहेच, “भगवान के घर देर है, अंधेर नही. “मित्रांनो “धीर धरा, प्रयत्न करा” यापुढेही जाऊन मी असे म्हणेन की “धीर धरा, प्रगती करा”. यश नक्कीच आपले असेल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)