आशावादी व्हा !!

आता प्रत्येक क्षेत्रांत नवीन शोध लागत आहेत. त्यांचा फायदा समाजाला नक्‍कीच होतो. वैज्ञानिक संशोधनामुळे निसर्गातील विविध पैलूंचे ज्ञान प्राप्त होते. सध्याच्या बदलत्या काळात नवीन कार्यपद्धतीचा आचरणात स्वीकार करणे आवश्‍यक झाले आहे.

प्रत्येक व्यक्‍तीची मानसिकता व कार्यक्षमता भिन्न असते. व्यक्‍तीच्या अपेक्षेप्रमाणे घटना घडत गेल्या तर आनंद व समाधान मिळते. प्रत्येक घटना मनासारखीच घडते असे नाही. अशावेळी अपेक्षाभंग होतो. ऑफिसमध्ये करावयाचे काम ठरवून दिलेल्या वेळात पूर्ण करू शकलो नाही तर वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागते. सहकार्याविषयीचे अंदाज चुकले, त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही या प्रकारचे विचार मनात येतात. ही भावना मर्यादित काळापुरतीच राहिली तर ते हिताचे ठरते.

हा अपेक्षाभंग, नैराश्‍य काळाबरोबर निघून जातात. भविष्यात माझे काम उत्तम दर्जाचे करील ही उमेद टिकून राहते; परंतु, नैराश्‍याचे विचार दीर्घकाळ टिकले तर आत्मविश्‍वास व उमेद कमी होत जाते. माझ्याकडून अपेक्षा ठेवलेली कामे मी यशस्वीपणे करू शकेल का? माझ्याकडून अपेक्षित असलेले काम पूर्ण करण्याकरिता माझी क्षमता कमी पडेल का? या प्रकारच्या शंका मनात उत्पन्न होतात. या शंकांचा परिणाम कृती अमंलात उतरविण्यामध्ये अडथळा निर्माण करतात.
व्यक्‍तीची उमेद कमी होऊ लागते. दैनंदिन जीवनातील परिचित व सहज करता येण्यासारख्या कृती कठीण वाटतात. अपेक्षाभंग व अपयश हे कधीही कायमस्वरूपी नसेत ही जाणीव व्यक्‍तीने जोपासली पाहिजे.

माझी स्पर्धा स्वतःची आहे ही भावना दृढ होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी मी अपयशी होणार नाही, असा संदेश व्यक्‍तीने स्वतःला दिला पाहिजे. स्वतःची क्षमता, ज्ञान आणि बुद्धिमता यांचा शोध घेणे उपयुक्त ठरते. खरं म्हणजे एखादे अपयश व्यक्‍तीला स्वतःविषयी विचार करण्यासा मदत करते. स्वतःची बलस्थाने निश्‍चितपणे जाणता येतात. कामाविषयी किंवा आप्तेष्टांविषयी कशादृष्टीने अवलोकन केले पाहिजे याची सवय अमूल्य ठरते. यामुळे सहजासहजी अपेक्षाभंग होत नाही. अपेक्षाभांगातून निर्माण होणाऱ्या नैराश्‍यावर व्यक्‍ती मात करू शकते. नैराश्‍यावर विजय मिळवला तर यशाचा मार्ग सुलभ होतो.

कोणत्याही घटनेमुळे नैराश्‍य आले असेल तर त्याविषयी कुटुंबातील व्यक्‍ती किंवा विश्‍वासू मित्राशी स्वतःचे विचार व्यक्‍त करावेत. यामुळे अनेकदा काल्पनिक विचारांपासून दूर होण्यास मदत होते. मनावरील ओझे हलके होते. स्वतःची समजूत करून घेतलेली घटना फार गंभीर नाही याची जाणीव होते.

या संदर्भात एका व्यक्‍तींचे अनुभव पाहू. (नाव काल्पनिक आहेत.)
श्रीकांत जोशी हा इंजिनियरचा विद्यार्थी परीक्षेकरता अभ्यास करत होता. तो स्वतःची तुलना इतर वर्गमित्रांबरोबर करू लागला. या तुलनेमुळे मी फारच मागे पडलो आहे या परीक्षेला सामोरे जाणे मला जमणार नाही, परीक्षेला तीन आठवड्यांचा अवधी असताना तो मानसोपचार तज्ज्ञांकडे गेला.

मानसोपचारतज्ज्ञाने त्याचे विचार जाणून घेतले आणि तुझी क्षमता असताना सुद्धा इतरांशी केलेल्या तुलनेमुळे तुझा आत्मविश्‍वास डळमळीत झाला आहे यामुळे परीक्षेचा विचार मनात आल्यावर तुला निराश वाटू लागते. पुढच्यावेळी परीक्षेस बसावे हा विचार पक्‍का होत गेलेला आहे. काहीकाळ तो मोकळेपणाने बोलू लागल्यावर डॉक्‍टरांनी परीक्षा तुझ्या आवाक्‍यात आहे, तू निराश होऊ नकोस. परंतु, नियमितपणे, सातत्याने प्रयत्न करत राहा. त्यामुळे निराशाजनक विचार दूर होऊन, आत्मविश्‍वास व स्मरण वाढेल, असा विश्‍वास दिला. रिझल्ट लागल्यावर तो डॉक्‍टरांना भेटायला आला व परिक्षेतील यशामुळे तो खूपच आनंदी झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)