बीसीसीआयकडून 4 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

पूनम यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांच्या नावांची घोषणा

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह महिला क्रिकेटपटू पूनम यादव आणि भारताच्या विश्‍वचषक संघातील सदस्य रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांच्या नावांची शिफारस केली असल्याची क्रिकेट प्रशासकीय समितीने याची घोषणा केली आहे.

आतापर्यंत 53 क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 1961 साली सलीम दुराणी यांना पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. 2018 साली महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. ज्येष्ठतेच्या निकषावर अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्यात येते.

पूनम यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजब कामगिरी केली आहे. तिने गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही उत्तम योगदान दिले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात यादवने चांगली कामगिरी केली आहे. तिने क्रमशः चार आणि दोन बळी टिपले आहेत. यादवने आत्तापर्यंत 41 एकदिवसीय, 54 टी-20 आणि एक कसोटी सामना खेळले आहे. यामध्ये तिने आत्तापर्यंत अनुक्रमे 63, 74 आणि तीन बळी टिपले आहेत.

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकताच संघ जाहीर केला. त्यात अनपेक्षितपणे जडेजाच्या नावाचा समावेश करण्यात आला. शमी आणि बुमराह हे भारताचे प्रमुख गोलंदाज आहेत. या दोघांनी मागील काही वर्षांत परदेशात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना हतबल केले आहे. बुमराहने अल्पावधीतच भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले.

बुमराहने 49 वन डे सामन्यांत 85 बळी टिपले आहेत. शमीनेही 63 वन डे सामन्यांत 113 बळी टिपण्याचे रेकॉर्ड नावावर केले आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा संघाचा नियमित सदस्य नसला तरी त्याने अनेक सामन्यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने 151 वन डे सामन्यांत 2035 धावा केल्या आहेत आणि 174 बळी टिपले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)