बीसीसीआय “नाडा’च्या कक्षेत

मुंबई: जागतिक उत्तेजकविरोधी मार्गदर्शक तत्त्वांना आपण बांधील नाहीत, असे मत मांडणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डाने आता राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेशी (नाडा) संवाद साधून पुढील सहा महिने त्यावर काम करण्यास तयार असल्याचे सांगितले असून आता बीसीसीआय देखील नाडाच्या कक्षेत आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी बीसीसीआयचे पदाधिकारी आणि प्रशासकीय समितीची चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मात्र, अद्याप “नाडा’पर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, हा सहा महिन्यांचा करार असून त्यात आयसीसी, बीसीसीआय आणि “नाडा’ हे तीन सदस्य असतील. आमच्या नोंदणीकृत खेळाडूंच्या मूत्राचे नमुने “नाडा’मार्फत राष्ट्रीय उत्तेजकचाचणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतील. पण आम्ही त्याबद्दल समाधानी नसू तर या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. नमुने गोळा करण्याची प्रक्रिया मात्र आपल्या खाजगी संस्थेच्या माध्यमातून होईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेने (वाडा) आयसीसीला स्पष्ट केले होते की, बीसीसीआयने “नाडा’च्या कक्षेत यायला हवे, तरच आयसीसीने “वाडा’च्या अटींची पूर्तता केल्याचे स्पष्ट होईल.

बीसीसीआयच्या या अधिकाऱ्याने सांगितले की, खेळाडूंच्या मूत्रांचे नमुने आम्ही गोळा करू. “नाडा’च्या उत्तेजक नियंत्रण अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नाही. या नियंत्रण अधिकाऱ्यांकडून या नमुन्यांची हाताळणी चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचे अनेकवेळा आढळले आहे. भारतीय क्रिकेट संघात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यासारखे खेळाडू आहेत. तिथे आम्ही डोळे झाकून अशा अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्ही या कराराबाबत साशंक होतो. मात्र, सध्या सहा महिण्याचा करार करण्याबाबत आमचा विचार सुरू आहे.


“”मला उत्तेजक प्रतिबंधक चाचणीसंदर्भात बीसीसीआयकडून लेखी स्वरूपात अधिकृतपणे सूचना आल्याशिवाय मी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही,”
नवीन अगरवाल, संचालक “नाडा’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)