तळातील फलंदाजांकडून फलंदाजी शिका – विराट कोहली 

बर्मिंगहॅम: इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटीत भारताच्या धावा रोखण्यात यश मिळवले. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांनी निराशा केली. फलंदाजांना आणखी चांगली खेळी करता आली असती, अशी खंत कर्णधार विराट कोहली याने बोलून दाखवली. इशांत शर्मा आणि उमेश यादवचे मात्र विराटने कौतुक केले.
विजयासाठी 194 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने 162 धावांत गुंडाळून एजबॅस्टन कसोटीत 31 धावांनी विजय साजरा केला. या विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0ने आघाडी मिळवली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा हा एक हजारावा कसोटी सामना होता. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. सामन्यात गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्यानंतर विराट वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली.
सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने इशांत शर्मा आणि उमेश यादव यांची स्तुती केली. यावेळी विराट कोहलीने पराभव मान्य करतानाच आपली चूकही कबूल केली. तो म्हणाला की फलंदाजांनी मैदानावर कसे टिकून रहायचे ते इशांत -उमेश यांच्याकडून शिकायला हवे. यासामन्यात झालेल्या चुका आम्ही पुढील सामन्यात होऊ देणार नाही. झालेल्या चुकापासून बोध घेत त्या पुढे होणार नाहीत याची काळजी घेऊ. मधल्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर थांबायला हवे होते. छोट्या छोट्या भागिदारी झाल्या असत्या तरी विजय मिळवता आला असता.
सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की सामना एकतर्फी न होता रंगतदार झाला याचा आनंद आहे. आम्ही आमचे 100 टक्के दिले. पण इंग्लंडची कामगिरी आमच्यापेक्षा सरस ठरल्यामुळे आमचा पराभव झाला. आम्ही हरले असलो तरी त्याचे शल्य मनात नाही त्याउलट लढल्याचा अभिमान असल्याचे विराट कोहली म्हणाला. फलंदाज आणखी चांगली कामगिरी करु शकले असते पण ते धावा जमवण्यात अपयशी ठरल्याची कबुलीही यावेळी विराट कोहलीने दिली. पुढे बोलताना तो म्हणाला की, आमचा पराभव झाला असला तरी लढा दिल्याचा आनंद आहे. त्याबरोबरच पुढील कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 149 आणि 51 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून इशांत शर्मा आणि अश्‍विनने गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले. पुढील सामन्याआधी एकत्रितपणे पहिल्या सामन्यात झालेल्या चुकांचा विचार करायला हवा, असंही कोहली म्हणाला. पहिल्या डावात खालच्या फळीने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यातून आपल्याला धडा घ्यायला हवा, असंही तो म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)