पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता उच्चांकी पातळीवर 

Electricity
नवी दिल्ली: जून महिन्यात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता तब्बल 6.7 टक्‍क्‍यांनी वाढली असल्याची आकडेवारी सरकारने आज जाहीर केली. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ही उत्पादकता 7 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे.
या क्षेत्रातील सात प्रमुख उद्योगाची जून महिन्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यातल्या त्यात सिमेंट, तेल शुद्धीकरण आणि कोळशाच्या उत्पादकतेत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. याअगोदर नोव्हेंबर 2017 मध्ये या क्षेत्रातील उत्पादकता 6.9 टक्‍के इतकी झाली होती. त्यानंतर या क्षेत्रात मरगळ आल्याचे वातावरण होते. मे 2018 मध्ये तर या क्षेत्राची उत्पादकता केवळ 4.3 टक्‍के इतकी मोजली गेली होती. तर गेल्या वर्षी या क्षेत्राची उत्पादकता केवळ 1 टक्‍क्‍यानी वाढली होती.
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यात सिमेंटचे उत्पादन 13.2 टक्‍क्‍यांनी, तेल शुद्धीकरण 12
टक्‍क्‍यांनी तर कोळशाचे उत्पादन 11.5 टक्‍क्‍यानी वाढले आहे. मात्र क्रुडचे उत्पादन वाढण्याऐवजी 3.4 टक्‍क्‍यांनी आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन 2.7 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. वीजनिर्मिती बऱ्यापैकी म्हणजे 4 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. त्याचबरोबर खताचे उत्पादन केवळ 1 टक्‍क्‍यानी
वाढले आहे.
आणखी समाधानाची बाब म्हणजे एप्रिल ते जून या काळात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता 5.2 टक्‍क्‍यानी वाढली आहे. जी की गेल्या वर्षी केवळ 2.5 टक्‍क्‍यानी वाढली होती. एकूण औद्योगिक उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 40 टक्‍के असतो त्यामुळे आगामी काळात औद्योगिक उत्पादन वाढण्याची जास्त शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)