बॅंकिंग सेवांबरोबर कृषि क्षेत्रातील उत्पादने उपलब्ध होणार
नवी दिल्ली – नव्या तंत्रज्ञानामुळे बॅंकिंग क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. इंटरनेट बॅंकिंग आणि मोबाईल बॅंकिंग वाढत असल्यामुळे परंपरागत बॅंकिंग पद्धतीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे बॅंकांना आपली उलाढाल आणि नफा वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बडोदा बॅंकेने आता ई- कॉमर्स उद्योगात पदार्पण केले आहे.
बॅंकेच्या ई-कॉमर्सच्या व्यासपीठावरून ग्राहकांना आता बॅंकिंग सेवा बरोबरच शेतीसंदर्भातील उत्पादने मिळणार आहेत. असे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी बॅंकेने भागीदाराचा शोध घेणे सुरू केले आहे. नजिकच्या काळात या व्यासपीठावरून ग्राहकांच्या इतरही गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
त्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांना मूळ बॅंकिंग सेवा बरोबरच इतर मूल्यवर्धित सेवा मिळू शकणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे परंपरागत बॅंकिंगवर परिणाम होत असल्यामुळे आगामी काळात सर्वच बॅंकांना आपला महसूल आणि नफा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण मार्गाचा अवलंब करावा लागेल, असे बोलले जाते.