बारामुल्लामध्ये दहशतवाद्याला अटक

हिंसाचाराबाबत युवकांना चिथावणी देण्याचे काम वर्षभर केले

काश्‍मीरबाबत खोटी माहिती मिळाल्याचे पत्रकारांसमोर केले मान्य

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील बरामुल्ल जिल्ह्यामध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याच्या प्रयत्नातील एका पाकिस्तानी दहशतवाद्याला आज सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. हा दहशतवादी श्रीनगरच्या परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सक्रिय होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आज या दहशतवाद्याला पत्रकारांसमोर हजर करण्यात आले. मोहम्मद वकार अवान असे या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव असून त्याने जुलै 2017 मध्ये सीमा ओलांडून भारतीय हद्दीमध्ये प्रवेश केला होता. तो मूळचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या मियानवाई भागातल्या मोहल्ला मियाना इथला रहिवासी आहे, असेही सुरक्षा रक्षकांनी सांगितले आहे.

मोहम्मद वकार हा “लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून काश्‍मीर खोऱ्यातील काही भागांमध्ये दहशतवादी कारवायांना पुन्हा सुरुवात करण्याचे उद्दिष्ट त्याला देण्यात आले होते. अवान याला “छोटा दुजाना’ असेही टोपणनावाने ओळखले जात असे. जम्मू काश्‍मीरमधील नागरिकांवर लष्कराकडून अत्याचार केल्या जात असल्याच्या कारणातून तो दहशतवादी संघटनेकडे ओढला गेला. मात्र काश्‍मीर खोऱ्यामध्ये आल्यावर असे काहीही घडत नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

मुझफ्फराबादेत चार महिने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला काश्‍मीरमधील अत्याचारांच्या काल्पनिक घटनांबाबत सांगितले गेले. महिला, बालकांवरही अत्याचार होतात. मुस्लिमांची घरे पाडली, जाळली जातात. मुस्लिमांना प्रार्थनाही करू दिल्या जात नाहीत, असे आपल्याला खोटेच सांगितले होते, असे अवान याने पत्रकारांसमोर कबूल केले. काश्‍मीरमधील परिस्थिती आपल्याला सांगितली गेली त्यापेक्षा खूपच वेगळी होती, हे आपल्या लक्षात आल्याचेही आवान याने मान्य केले.

आपण स्वतः कोणत्याही हल्ल्यात सहभागी नव्हतो. पण दहशतवादी कारवायांसाठी श्रीनगर, बारामुल्ला आणि कुपवाडा परिसरामध्ये फिरल्याचे त्याने मान्य केले. त्याचे वाहन पोलिसांच्या वाहनावर आदळल्यावर त्याच्या वाहनाचा चालक पळून गेला आणि आवान पोलिसांच्या तावडीत सापडला होता.

पाकिस्तानकडून युवकांना काश्‍मीरच्या नावावर कसे चिथावले जाते. त्यांना जैश ए मोहंम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनांमध्ये कसे ओढले जाते, याचा आवानचा कबुलीजबाब हा जिवंत पुरावाच आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)