बारामतीतील मतदानाचा टक्का राखण्याचे आव्हान!

– रोहन मुजूमदार 

बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यंदा तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभ्या राहात असून त्यांना विजयाची खात्री आहे. मात्र, यंदा त्यांना आपल्याच बाल्लेकिल्ल्यात म्हणजेच बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कायम राखण्याचे आव्हान आहे. कारण बारामती तालुक्‍यातील 22 गावांचा पाणीप्रश्‍न गेल्या 50 वर्षांत पवार कुटुंबीयांना सोडवता आला नाही. तर आता सध्याचा “हॉट’ विषय असलेला नीरा नदीचे प्रदूषित पाण्याचाही प्रश्‍न सध्या गाजत असून त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केल्याने हक्‍काच्या मतदारसंघातील मतदारांपुढे मतांसाठी झोळी पुढे केल्यास ती फाटली नाही पाहिजे यासाठी खासदार सुळेंना फार कष्ट घ्यावे लागणार आहेत.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावातच दबदबा असून त्यांचा हक्‍काचा मतदारसंघ म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. त्यांच्या वलयामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जो उमेदवार उभा राहील त्यास नागरिकही डोळेबंद करून भरभरून मते देणार यात कोणाचेही दुमत नाही. तर हे अमूल्य मत देताना आपल्या गावातील मूलभूत समस्या सुटल्या पाहिजे, अशी मतदारांची अपेक्षा असते. मात्र, गेल्या दोन टर्ममध्ये बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील 22 गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यात खासदार सुळेंना अपयश आले असून त्या भागाकडे क्वचितच फिरकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना या भागातून दगफटका होण्याची चिन्हे गडद झाली आहे. त्यामुळे या परिसरात खासदार सुळे प्रचारासाठी येणार का आणि आल्यावर मतदारांच्या प्रश्‍नांची उत्तरे देणार का? हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

बारामतीचा जिरायती भाग हा दुष्काळी “किल्ला’ म्हणूनच ओळखला जातो. तर या भागातील दुष्काळ हटवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांना उपाययोजना करण्यात अपयश आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर या परिसरातही सुळे यांनी क्वचितच भेट दिली. असल्याने त्यांना या भागाचा कळवळा नाही का? की त्यांनी या भागातील मतदारांना गृहीत धरले आहे असा सवाल या तिसऱ्या टर्ममध्ये उपस्थित केला जाणार असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.

…ही लाजीरवाणी बाब
मोरगाव प्रादेशिक नळ योजना, जानाई शिरसाई योजना, पुरंदर जलसिंचन योजना या तीन योजना बारामती तालुक्‍यातील जिरायती भागासाठी वरदान आहेत. मात्र, त्या क्वचितच कार्यान्वित होतात तर बहुतांश वेळा ठप्पच असल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी टॅंकर किंवा मैलोनमैल भटकंती करणे काही सुटलेले नाही. त्यामुळे एकप्रकारे ही खासदारांसाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जर खासदार सुळेंना या भागातून दगाफटका नको असेल तर इकडे विशेष लक्ष द्यावे लागले.

ठळक वैशिष्ट्ये
– बारामती विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष
– या मतदारसंघातील मतदारांना धरले गृहीत
– जिरायती भागातील पाणीप्रश्‍न सोडवण्यात अपयश
– 50 वर्षांपासून 22 गावे तहानलेलीच
– जिरायती भागासाठी खासदार सुळेंचे योगदान तोकडेच
– महिलांसाठी सदैव कार्यरत असलेल्या खासदार सुळेंना या भागातील महिलांच्या डोक्‍यावरील हंडा उतरवण्यात अपयश

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)