चार तालुके ठरविणार बारामतीचा खासदार

सव्वादोन लाखांनी मतदान वाढले : इंदापूर, दौंड, भोर, खडकवासला, पुरंदरवर ठरणार निकाल

पुणे – संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा 3.34 टक्‍के मतदान वाढले आहे. यंदा 61.54 टक्‍के मतदान झाले असून 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल 2 लाख 33 हजार 236 इतके मतदान वाढले आहे. दौंड, पुरंदर, भोर विधासभा मतदारसंघात गतवर्षीपेक्षा जादा मतदान झाले आहे. नवमतदार, बेरेजेचे राजकारण, भाजप उमेदवाराचे तगडे आव्हान ही कारणे आहेत. यातून खासदार सुप्रिया सुळे किंवा कांचन कुल यांना विजयासमीप नेणार आहेत. त्यामुळे बारामतीचा खासदार हा बारामती, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला ठरविणार आहे. यात बारामतीचीच चलती राहणार काय, तसेच वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्सुकता लागली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघाचा समावेश पुणे शहरात होतो, तर उर्वरित पाच मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही मतदारसंघ आहे. 2014 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात 18 लाख 9 हजार 920 इतके मतदार होते. यंदा मात्र बारामती मतदारसंघात एकूण 21 लाख 12 हजार 209 मतदारांपैकी 12 लाख 99 हजार 792 मतदारांनी हक्‍क बजावला आहे. 2014 मध्ये 58.20 टक्‍के मतदान झाले होते. यंदा 61.54 टक्‍के मतदान झाले आहे. यावेळी सर्वाधिक मतदान हे बारामती विधानसभा मतदारसंघात झाले असून याठिकाणी 70.24 टक्‍के मतदान झाले. इंदापूरमध्ये 64.39, दौंडमध्ये 64.05, भोरमध्ये 60.84, खडकवासला 53.20 टक्‍के मतदान झाले आहे.

दौंड, भोर, खडकवासला लीड तोडणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात गतवेळीपेक्षा बारामती (12.24). दौंड (6.05), भोर (5.75), खडकवासला (3.20), पुरंदर (3.04) ही मतदानाची वाढलेली टक्‍केवारी आहे. त्यामुळे यात बारामतीची टक्‍केवारी लक्षवेधी वाढली आहे. हा टक्‍का सुळे यांच्यासाठी लाभदायी ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यापाठोपाठ दौंड तालुका हा कांचन कुल यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. हे दोन मतदारसंघ सुळे आणि कुल यांना तारणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गतवेळी सुळे यांना मताधिक्‍य देणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघात यंदा पाच टक्‍क्‍यांवर मतदान वाढले आहे. खडकवासला आणि पुरंदर तालुक्‍यात सरासरी तीन टक्‍क्‍यांच्या वर मतदान वाढले आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे सुळे यांना मताधिक्‍य वाढणार असल्याचे चित्र आहे. मात्र, मतदारांचा गुप्त कौल सुप्त लाटेतून उमटणार काय, याची चर्चा सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामती वगळता चार तालुक्‍यांतील एकूण मतदानांची टक्‍केवारी ही अठरा टक्‍क्‍यांवर जात आहे. त्यात यदा कदाचित बारामती तालुक्‍याने सुळे यांना लीड दिले तर इतर चार तालुक्‍यांत वेगळा निकाल लागू शकतो, याची चर्चा सुरू झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)