भाजप अध्यक्ष अमित शहांनी केले राहुल गांधींना लक्ष्य
जयपुर: निवडणूक प्रचार काळात बॅंकांच्या थकित कर्जाचा विषय उपस्थित केल्याबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले आहे की बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात थकित कर्जे असतील तर ती कॉंग्रेस सरकारचीच देन आहे. कॉंग्रेसने भ्रष्ट मार्गाने दिलेली कर्जे बुडित ठरली असून ही कर्जे मोदींच्या सरकारने दिलेली नाहीत. कॉंग्रेसच्या गैरकृत्यांमुळेच बॅंकांची स्थिती वाईट झाली असल्याचे खापरही त्यांनी राहुल गांधी यांच्यावर फोडले. ते आज येथे नागौर जिल्ह्यातील कुचमन गावातील प्रचार सभेत बोलत होते.
बॅंकांची कर्ज मंजुर केल्याबद्दल नेहरू गांधी कुटुंबातील व्यक्तींना तसेच त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळत होते. ज्या कंपन्यांना कर्जे वितरीत केली गेली त्यांच्याकडून मिळालेल्या कर्जाच्या आधारेच रॉबर्ट वढेरा यांनी बिकानेर मध्ये दीडशे हेक्टर जमीन खरेदी केली आहे आता त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिले पाहिजे.
विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांनाही कॉंग्रेस सरकारच्या काळातच कर्जे दिली गेली असे ते म्हणाले. कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना ते भारतातच राहात होते कारण त्यांना या सरकारकडून कारवाई होण्याची भीती नव्हती पण केंद्रात मोदींचे सरकार आल्यावर मात्र कारवाईच्या भीतीने ते या देशातून पळून गेले असा आरोप त्यांनी केला. या कर्जेबुडव्या लोकांकडून प्रत्येक रूपया वसुल केला जाईल असा निर्धारही शहा यांनी यावेळी व्यक्त केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा