पुणे – बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता तारण ठेवून बॅंकेची तब्बल 75 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली. न्यायालयाने त्यांना 16 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
नितीन चंद्रकांत नाईक (वय 54) आणि मेघा नितीन नाईक (वय 49, रा. रामसुख अपार्टमेंट, शुक्रवारपेठ) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. साहिल नितीन नाईक (वय 33) आणि नयन विजय कर्डेकर (वय 33, रा. गुरुवारपेठ) यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीकांत सदाशिव आडकर (54, रा. कसबा पेठ, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा प्रकार ऑक्टोबर 2014 ते ऑगस्ट 2018 दरम्यान शुक्रवारपेठ येथे घडला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांनी आडकर यांच्या यशवंत को.ऑपरेटिव्ह बॅंकेच्या कराड शाखेत तसेच चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅंकेत (बुलढाणा) त्यांची शुक्रवार पेठेतील सिल्व्हर प्रेस्टीज ही मालमत्ता 5 कोटी 50 लाखांना तारण ठेवली. ही मालमत्ता बॅंकेकडे तारण ठेवली असताना बॅंकेच्या पूर्व परवानगीशिवाय ती मालमत्ता सानिध्य इंडस्ट्रीजला लिव्ह अँड लायसन्स करार करून दिली. तसेच संशयीत आरोपींनी बॅकेची बनावट शिक्के व कागदपत्रे तयार करून खोटे प्रमाणपत्र तयार केले. तसेच बॅंकेच्या अधिकाऱ्याची बनावट सही करून ती खरी असल्याचे भासविले. त्यानंतर मालमत्ता तारण असताना स्वतःच्या फायद्यासाठी यशवंत बॅंक आणि चिखली अर्बन बॅंकेच्या परवानगी शिवाय मालमत्ता कराड जनता बॅंकेकडे तारण ठेवून 75 लाख रुपये कर्ज घेऊन फसवणूक केली. बनावट लेटरहेड जप्त करायचे आहे, बनावट सह्या कोणी केल्या तसेच बॅंकांच्या झालेल्या फसवणुकीबाबत तपास करण्यासाठी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे आणि सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी पोलीस कोठडीची मागणी केली.त्यानुसार न्यायालयाने दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.