ख्राइस्टचर्च – साउथ आयलंडमधील ख्राइस्टचर्च शहरातील अल नूर आणि लिंगवूड मशिदीवर आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 30च्या आसपास लोक ठार झाले तर कित्येक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर ख्राइस्टचर्च शहरात शनिवारपासून न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये खेळला जाणारा सामना रद्द करण्यात आला आहे.
भारतीय वेळेनुसार आज सकाळी शहरातील ‘अल नूर’ मशिदीत अज्ञात इसमाने हल्ला केला. त्यावेळी या मशिदीत बांग्लादेशचा संपूर्ण संघ नमाजसाठी उपस्थित होता. सुदैवाने त्यांना मागच्या दाराने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जीव वाचवल्यासाठी बांग्लादेशच्या खेळाडूंनी स्थानिक सुरक्षारक्षकांचे आभारही मानले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड आणि बांग्लादेशमधील कसोटी सामना रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
या दरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाने उर्वरित दौरा रद्द केला असून संघ लवकरच मायदेशी परतणार आहे. 10 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत बांगलादेशचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिका पूर्ण झाली होती. तर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 2 सामने पूर्ण झाले होते. उर्वरित एक कसोटी सामना 16 ते 20 मार्च दरम्यान ख्राइस्टचर्च येथे होणार होता. मात्र या घटनेनंतर हा दौरा रद्द करण्यात आला असून बांगलादेशचा संघ लवकरच मायदेशी रवाना होणार आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करत असतानाच गोळीबार झाला. सर्व खेळाडू सुरक्षित आहेत. मात्र सर्वांना मानसिक धक्का बसला आहे. आम्ही सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितले आहे, अशी माहिती जलाल यांनी दिली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा फंलदाज तमिम इकबाल याने यावेळी ट्विट केले आहे की, गोळीबारातून संपूर्ण संघ बचावला आहे. अत्यंत भीतीदायक अनुभव होता. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.