पुणे – नगर रस्त्यावर जड वाहनांना बंदी

गर्दीच्या वेळेत प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग : 15 एप्रिलपर्यंत असणार बदल

पुणे – नगर रस्त्यावरील वाढता ताण कमी करून वाहतूक कोंडी व होणारे अपघात कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरेगाव भिमा ते कोंढापुरी (खंडाळा माथा) व चौफुला (वाजेवाडी) ते शिक्रापूर दरम्यान अवजड वाहनांना बंदी घातली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येत असून येत्या 15 एप्रिलपर्यंत वाहतूक व्यवस्थेबाबत हा बदल असणार आहे.

संबंधित ग्रामपंचायतींचीही होती मागणी
नगर रस्त्यावरील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुणे-नगर व शिक्रापूर-चाकण हे मार्ग जातात. यातच शिक्रापूर आणि भिमा कोरेगाव येथे रस्त्यालगत बाजारासाठी आलेल्या वाहनांमुळे नगर रस्ता अरुंद झाला आहे. यातच आसपासच्या परिसरातून येणाऱ्या जड वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक कोंडी होते. परिणामी मार्गावर अपघातांची संख्या देखील वाढलेली आहे. तसेच, परिसरातील शिक्रापूर, जातेगाव, करंदी व कासारी या ग्रामपंचायत सरपंचांनी देखील गर्दीच्या वेळी या मार्गावर जड वाहनांना बंदी घालावी, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.

कामगार, विद्यार्थ्यांवरही होत होता परिणाम
रांजणगाव इंडस्ट्रिज असोसिएशन एमआयडीसी रांजणगाव येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी व कामगार आहेत. त्यांना जाण्या-येण्याकरिता बसेस या शिक्रापूर मार्गे जात असतात. वाहतूक कोंडीमुळे नोकरीवर जाण्याकरिता कामगारांना विलंब होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व वेळेचे नुकसान होत आहे. याचा परिणाम रांजणगाव एमआयडीसीमधील कारखान्यांच्या उत्पन्नावर होत आहे. तसेच, स्कूल बसही वाहतूक कोंडीत सापडून विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास विलंब होतो. या सर्व बाबींचा विचार करून आणि अपघातांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

436 अपघातांमध्ये 188 जणांचा मृत्यू
मागील सहा वर्षांत नगर रस्त्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 436 अपघातांमध्ये 188 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 329 व्यक्ती जखमी झाल्या आहेत, अशी माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)