कलंदर: मतपेटी

उत्तम पिंगळे

निवडणुकीचे काम संपून गेल्यामुळे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट आरामात घोरत पडले होते. इतक्‍यात एक पेपरचा गोळा ईव्हीएमच्या तोंडावर पडल्याने ईव्हीएम जागी होते. त्यावर “सदा विजयी भव:’ असे लिहिले होते. तडक ईव्हीएम खिडकीतून पाहू लागते. एक नऊवारी साडीतील मतपेटी घाईघाईने निघत असते. ईव्हीएम ताबडतोब तिच्या पाठोपाठ जाऊन तिला धरून घरात घेऊन येते.

ईव्हीएम: ताई एवढ्या उन्हात कुठं बिगीबिगीनं चालल्यात. थोडा दम धरा की. घटकाभर थांबा गूळपाणी घ्या, मग निवांत निघा. (व्हीव्हीपॅटकडे पाहून) ए भाऊ उठ पटकन.
मतपेटी: अगं, त्याला कशाला उठवते मी निघणारच आहे. (व्हीव्हीपॅट उठून बसतो)
ईव्हीएम: मला सांग आधी, सदा विजयी भव: हे काय आहे?
मतपेटी: मी मतपेटी, तुमच्या पूर्वी मीच निवडणुकीत असावयाची. तुम्ही आल्यापासून आता आम्हाला कोणी भाव देत नाही. अगदी अडगळीत पडले.
ईव्हीएम: ओह… म्हणजे पूर्वी मतपत्रिकेवर शिक्‍का मारून ते ज्या पेटीत टाकायचे ती पेटी तू आहेस तर?
मतपेटी: होय, मला 2019 च्या निवडणुकीआधी कोर्टबाजी चालू असल्यामुळे असे वाटले की आम्हाला पुन्हा बोलावण्यात येईल. अर्थात मला मनापासून वाटत होते की तशी शक्‍यताच नाही; पण माझ्या सहकारी बहिणींनी मला गळी पाडले. अडगळीतून डागडुजी करून नऊवारी नेसवून पाठवून दिले. पूर्ण निवडणूक मी लांबून पाहात होते. मतदान कसे होत आहे तेही पाहिले. मत पटापट टाकले जात होते व मतमोजणी खूपच लवकर होत होती. यावेळी तुझा भाऊ व्हीव्हीपॅटही सोबत आहे. त्यानेही चांगली कामगिरी केली.
ईव्हीएम: असं होय. घ्या गूळपाणी घ्या. मला तुमच्या वेळीच्या निवडणुकीबाबत ऐकावयास आवडेल.
मतपेटी: त्या वेळी अनेक मतपेट्या लागायच्या तसेच मतपत्रिका प्रचंड असायच्या. एकाच ठिकाणी जर जास्त उमेदवार असतील तर लांबच लांब मतपत्रिका असे तसेच तिच्यावर व्यवस्थित शिक्‍का मारून ती फोल्ड करून माझ्यात टाकावी लागत असे. 1989 ला कायदा आणून प्रथम तुला आणले गेले. आता तू जवळजवळ तिशीची झालीस तसेच हा पॅटही 5-6 वर्षांचा झाला असेल. 2013 च्या नागालॅंडमधील नोकसेन मतदारसंघात याचा पहिल्यांदा वापर झाला.
ईव्हीएम: बरोबर आहे, आता सहा वर्षांचा होईल तो.
मतपेटी: मला उगीच माझ्या बहिणीने बाशिंग बांधून चढवले व मीही भुलून गेले. पण नाही माझ्या जागी तूच योग्य आहेस हे मला समजले. तुझे काम पटापट आणि सुरक्षित आहे. तुझ्यामुळे मोठमोठ्या मतपत्रिका व माझ्यासारख्या मोठ्या मतपेट्या बंद झाल्या. त्यामुळे वृक्षांची कत्तलही थांबली तसेच मतमोजणीसाठी तुझी वाहतूक माझ्यापेक्षा खूपच सोपी झाली. तुझ्यामुळे आता मतमोजणी पटापट होऊ लागली आहे. माझ्यासारखे तीन-चार दिवस आता चालत नाही. तुझ्यावर घेतल्या जाणाऱ्या खोट्या शंकांमुळे आता व्हीव्हीपॅटही तुझ्या बरोबर असतो. त्यानेही चांगली कामगिरी केली. 2004 च्या निवडणुकीत तुझा सर्वत्र वापर झाला. माझी जागा आता तू घेतलेली आहेस. माझे कार्य संपलेले आहे. मी येथे यायलाच नको होते म्हणूनच ती चिठ्ठी तुझ्या अंगावर टाकून निघून जात होते. तुम्ही बोलल्यामुळे मला बरे वाटले. आता मला निघायलाच हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)