छावण्या सुरु न झाल्याने बळीराजा रडकुंडीला

24 जानेवारीला शासनाचा निर्णय होऊनही अद्यापही एकही छावणी सुरू नाही
90 हजार जनावरांची होतेय हेळसांड
तालुक्‍यातुन 74 प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल
पशुधन जगवण्यासाठी बळीराजा भोवती सावकारी फास
संस्था चालकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा

गोंदवले – माण तालुक्‍यात तीव्र दुष्काळ असल्याने शासनाने ऑक्‍टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर केला होता. परंतु, अजूनही छावण्या सुरू न झाल्याने बळीराजा रंडकुंडीला आला आहे. छावण्या सुरू करण्याबाबत हालचाली दाखवून शेतकऱ्यांना सोयीस्कररित्या गंडवण्याचा प्रकार सुरू असून अनेक लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणूकीत दंग असून बळीराजा एकाकी पडला आहे.

माण तालुक्‍यात 72303 मोठी जनावरे तर 16880 लहान जनावरे अशी एकुण शासकीय नोंदी प्रमाणे 89 हजार 183 जनावरे आहेत. यामध्ये शेळ्या व मेंढ्यांची आकडेवारी गृहीत धरली नसल्याने माण तालुक्‍यातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे शेळ्या व मेंढ्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होणार आहे. सध्या माण तालुक्‍यात छावणी चालवण्यासाठी 74 प्रस्ताव दाखल झाले असून ते प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहेत. तेथे सर्व संस्था चालक चकरा मारत असले तरी छावण्या नेमक्‍या कधी सुरू होणार हे प्रशासनालाही सांगता येईना. 24 जानेवारी 2019 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी भागात आवश्‍यकतेनुसार जनावरांना चारा व पाणी देण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी अद्यापही माण तालुक्‍यात एकही छावणी सुरू नाही.

सलग तीन हंगाम पाण्यावाचून वाया गेल्याने पेरणीच झाली नाही. तालुक्‍यात दुष्काळी स्थिती गेल्या वर्षभरापासूनच भयानक बनली आहे. शेतकऱ्यांच्या पदरी गेल्या दीड वर्षापासून काहीच पडले नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न चांगलाच भेडसावत आहे. पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला आहे. बादलीने पाणी काढावे एवढेही पाणी विहिरीच्या तळाशी नाही, अशी सर्वच गावांत स्थिती आहे. चारा विकत घ्यावा तर त्यालाही हजारो रुपये मोजावे लागत आहेत. जनावरांच्या चारा आणि पाण्याची सोय करण्यातच शेतकऱ्यांचा दिवस खर्ची पडत आहे. फलटण, माळशिरस, अकलूज व अन्य भागातील विक्रीस येणाऱ्या उसाच्या वाड्याच्या पेंढ्या पाच रूपये (पाच वाडे) एवढ्या महागड्या किंमतीने विकत घेऊन जनावरे जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दमडीचेही उत्पन्न नसल्याने बळीराजा एकाकी पडला आहे.

सध्या बळीराजा सावकारांचे उंबरे झिजवून जनावरे जगवावी लागत आहेत. नुसता दुष्काळ जाहीर झाला असला तरी अद्यापही कोणतीच ठोस मदत मिळाली नाही. जनावरे चारा मिळत नसल्याने हबंरडा फोडत आहेत. त्यामुळे आता शासनाने पहिल्यांदा किमान जनावरांसाठी चारा छावण्या त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या लोकसभेच्या निवडणूकीत अनेक लोकप्रतिनिधी गुंतल्याने जगाचा पोशिंदा दुलर्क्षित झाला आहे.

शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून चारा विकत घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत. सध्या चाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर बनला असून प्रशासनाने त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात.

– सुनिल खाडे, ग्रामपंचायत सदस्य, पळशी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)