आता ऑलिम्पिकसाठी खेळणार – बाला रफिक

जामखेड (नगर) – आठ वर्षे कुस्तीच्या आखाडयात अविरत सराव करून अंत्यत प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली. आता यापुढे ऑलम्पिकसाठी प्रयत्न करून देशाचे नाव उज्ज्वल करेल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, सलग्न अहमदनगर जिल्हा तालिम संघ आयोजित जामखेड तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख यांची जामखेड शहरातून मिरवणूक काढून येथील खर्डा चौकातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रागंणात भव्य नागरी सत्करांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कुस्ती महर्षी आण्णासाहेब पठारे, कुस्तीचे जनक उत्तमदादा फडतारे, बाला रफिक यांचे वडील आझम शेख, तहसीलदार विशाल नाईकवाडे, करमाळयाचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर, माजी प्राचार्य नारायण काशिद, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद यांच्यासह तालुक्‍यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कुस्ती महर्षी आण्णासाहेब पठारे म्हणाले की, महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर बाला रफीक शेख यांचा सत्कार होणे ही काळाची गरज आहे. हा किताब बालाने मिळविला मात्र सर्वाधिक आनंद त्याच्या वडिलांना झाला आहे. बालाने सत्कारात वेळ वाया घालवण्यापेक्षा ऑलम्पिकसाठी सराव सुरू करावा व ऑलम्पिकच्या ध्येयासाठी लढावे.

जालना जिल्ह्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील विविध वजनी गटात अहमदनगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल पैलवान सचिन दाताळ, विष्णू खोसे, अनिल बाम्हणे, केवल भिंगारे व महाराष्ट्र शासनाचा अनुलोम सन्मिय पुरस्कार मिळविलेले करमाळ्याचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर, तहसीलदार विशाल नाईकवाडे, नारायण काशिद या सर्वाना कुस्ती महर्षी आण्णासाहेब पठारे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन राजाभाऊ देवकाते व जाकीर शेख यांनी केले तर आभार श्रीकांत काशिद यांनी मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)