बैलगाडा संघटनेचा खासदार आढळरावांना पाठिंबा

चाकण – शर्यतींना प्रोत्साहन देण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ठिकठिकाणी बैलगाडा घाट बांधले, बैलगाडा विमा योजना सुरु केली. शर्यतींवर बंदी आल्यावर स्वत:च्या खर्चाने न्यायालयात याचिका दाखल केली. भविष्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्याचे काम आढळराव हेच करतील, असा विश्‍वास प्रकट करीत खेड तालुका बैलगाडा मालक संघटनेने खासदार आढळराव यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

आमदार सुरेश गोरे यांच्यासमवेत काल निमगाव खंडोबा येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी खेड तालुका बैलगाडा संघटनेचे मुकुंद बोऱ्हाडे, कैलास घाडगे, राहुल सातपुते, देवराम सातपुते, बाळासाहेब मांजरे, संदेश आल्हाट, निमगावचे अमर शिंदे, बी. टी. शिंदे, संतोष शिंदे, विठ्ठल शिंदे, हनुमंत येळवंडे, बबनराव शिंदे, भाऊसाहेब लोणकर, संजय माशेरे, राहुल कान्हुरकर, काळुराम गायकवाड, शशिकांत बोऱ्हाडे, बबनराव राऊत आणि अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, आघाडी सरकारनेच बैलगाडा शर्यती बंद केल्या. शर्यतींवर बंदी घातल्यानंतर राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. उलट खासदार आढळराव यांनी स्वखर्चाने लढा दिला. या आंदोलनात त्यांच्यावर अनेक केसेस दाखल आहेत. परंतु कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने कोर्ट कचेरी व आंदोलनात सहभाग घेतल्याचे दिसले नाही. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या शर्यतीबाबतच्या घडामोडींचा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना अजिबात अभ्यास नाही. ते केवळ शर्यती सुरु झाल्यावर सगळ्यात पुढे घोडा पळविणार असे सांगत आहेत; परंतु शर्यती सुरू कोण करणार? असा सवाल बैलगाडा मालक संघटनेच्यावतीने करण्यात आला. त्यामुळे सर्व बैलगाडा मालकांनी संघटीत होऊन खासदार आढळराव यांच्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

60-60 वर्षे या लोकांनी सत्ता भोगली, पण त्यांना शेतकऱ्यांचे भले करता आले नाही. 2004 ते 2009 अशी 10 वर्षे केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, त्यावेळी मी सातत्याने संघर्ष करुनही या भागातील जनतेच्या विकासाच्या रेल्वे, रस्ते यासारख्या प्रकल्पांसाठी एक दमडाही नाही दिला. 2014मध्ये केंद्रात एनडीएचे आणि राज्यात युतीचे सरकार आले. त्यानंतरच रेल्वे, रस्ते यासारखे मोठे प्रकल्प मंजूर झाले. गेल्या पाच वर्षांत मी 14 हजार कोटींची कामे करू शकलो.
-शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)