बहुजन वंचित आघाडी राज्यातील सर्व जागा लढणार : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी कॉंग्रेसने आखलेला आराखडा आमच्या समोर मांडला नाही म्हणून त्यांच्याशी आमच्या वाटाघाटी बंद झाल्या आहेत. तरीही उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत चर्चेची दारे खुली असतील, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

माळीनगर (ता. माळशिरस) येथे आयोजित वंचित बहुजन मेळाव्यासाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला आग्रह होत आहे, त्याचा आपण विचार करत आहोत. माढा लोकसभेसाठी माजी आमदार ऍड. विजय मोरे यांचे नाव त्यांनी जाहीर केले. ठरवलेल्या उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अवधी असला पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बहुजन वंचित आघाडी राज्यातील सर्व 48 जागांवर उमेदवार देणार आहे. आमचे उमेदवार जाहीर होण्याआधी कॉंग्रेसने योग्य वाटाघाटी केल्यास त्यांच्याशी आघाडी होऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान असावेत, असा कॉंग्रेसचा आग्रह आहे. परंतु संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी कॉंग्रेसने कोणत्या प्रकारचा आराखडा तयार केला आहे, ते घटक पक्षांना सांगणे गरजेचे आहे. बहुजन वंचित आघाडीबरोबर एमआयएम यापूर्वीच आलेला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
दोन समाजांत वाद निर्माण करण्याचा डाव

आरक्षणाबाबत आंबेडकर म्हणाले, मंडल आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले आहे, तर फडणवीस सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. राज्य सरकारने या आरक्षणाचे भाग 1 व भाग 2 असे वर्गीकरण न केल्याने आरक्षणासंदर्भात ओबीसीवर्ग चिंतातूर झाला आहे. मराठा समाजावर विश्वास आहे. परंतु मराठा पुढारी आपले वर्चस्व टिकवण्यासाठी ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतील, अशी ओबीसींना भीती वाटत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा सरकारचा हा डाव संभाजी ब्रिगेडच्या लक्षात आला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)