बागपत मतदारसंघ : सत्यपाल सिंह विरुद्ध जयंत चौधरी

– शैलेश धारकर 

पश्‍चिम उत्तर प्रदेशातील एक प्रमुख राजकीय गड आणि जाटलॅंड म्हणून ओळख असलेल्या बागपत लोकसभा मतदारसंघाकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि त्यांचा मुलगा अजित सिंह यांची कर्मभूमी म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. तथापि, 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेमध्ये ही जागा भाजपाने पटकावली. या जागेवरून मुंबईमध्ये पोलीस कमिशनर राहिलेले सत्यपाल सिंह हे खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह हे तिसऱ्या स्थानावर गेले. साहजिकच यंदा रालोदपुढे ही जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी आहे.

बागपत हे शेती आणि उद्योग अशा दोन्हीही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. 2019 ची निवडणूक रालोदच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. खरे पाहता कधी काळी हा मतदारसंघ रालोदचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014 मध्ये खुद्द अजित सिंहांनाच पराभव पत्करावा लागला. हा धक्‍का खूप मोठा होता. तथापि, काही महिन्यांपूर्वी कैराना येथील पोटनिवडणुकांमध्ये रालोदच्या उमेदवाराने विजय मिळवून या पक्षाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. बागपतमध्ये सर्वाधिक दबदबा हा जाट समुदायातून येणाऱ्या चौधरी घराण्याचा आहे. 1977 ते 1984 या काळात चौधरी चरणसिंगांनी या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले. पुढे 1989 नंतर त्यांचे चिरंजीव अजित सिंह यांनी चरणसिंगांचा वारसा चालवत मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. तेव्हापासून 1998 चा अपवाद वगळता 2014 पर्यंत ही जागा अजित सिंहांकडे राहिली.

यंदा बागपत मतदारसंघातून सत्यपाल सिंह यांना पुन्हा संधी देण्याचा भाजपाचा विचार आहे. तर रालोदतर्फे अजित सिंहांचे चिरंजीव जयंत चौधरी महागठबंधनकडून रिंगणात उतरणार आहेत. आपल्या कुटुंबाचा गड वाचवण्याचे मोठे आव्हान जयंत यांच्यापुढे असणार आहे. यापूर्वी जयंत यांनी 2009 मध्ये मथुरा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत खासदारकी मिळवली होती. मात्र 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक असणाऱ्या हेमा मालिनी यांनी जयंत यांचा प्रचंड मताधिक्‍याने पराभव केला. बागपत लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख मतदार आहेत. हा मतदारसंघ प्रामुख्याने जाट आणि मुस्लीमबहुल आहे.

त्यामुळेच रालोदने येथे सुरुवातीपासून पाय रोवलेले आहेत. बागपत लोकसभा मतदारसंघात सिवालखास, छपरौली, बडौत, बागपत आणि मोदीनगर असे एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सिवालखास हा मेरठ जिल्ह्यात आहे; तर मोदीनगर गाझियाबाद जिल्ह्यात आहे. 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पाचपैकी केवळ छपरौली विधानसभा मतदारसंघातून रालोदला विजय मिळवता आला होता. अन्य चारही विधानसभांमध्ये भाजपाचे आमदार निवडून आले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)