स्विस ओपन बॅडमिंटन : सायना, समीरवर भारतीय संघाची मदार

बसेल (स्वित्झर्लंड) – ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर आता मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद पटकावणारी सायना नेहवाल तसेच गतविजेता समीर वर्मा यांच्यासमोर गतविजेतेपद कायम राखण्याचे आव्हान असून भारतीय संघाची मदार या दोघांवर असणार आहे.

या स्पर्धेमधे जागतिक क्रमवारीत 14व्या क्रमांकावर असलेल्या समीरला पहिल्याच फेरीत आपला मोठा भाऊ सौरभ याच्याशी लढावे लागणार आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत दुखापतीला सामोरे जावे लागल्याने सौरभने या स्पर्धेतून माघार घेतली होती. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यानंतर समीरची दुसऱ्या फेरीत भारताच्याच बी. साईप्रणीतशी गाठ पडण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर उपांत्य फेरीत त्याला गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन याच्याशी झुंज द्यावी लागू शकते. त्यामुळे ही स्पर्धा समीरची कसोटी बघणारी स्पर्धा ठरू शकते.

तर, दुसरीकडे भारताची फुलराणी सायना नेहवालची ही या मोसमातील चौथी स्पर्धा आहे. इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सायनाला मलेशिया मास्टर्स स्पर्धेत उपांत्य फेरीत तर ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑल इंग्लंड स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात सायनाला मोक्‍याच्या क्षणी केलेल्या चुकांमुळे पराभवाचा फटका बसला होता. त्यातून सावरणाऱ्या सायनाने स्वीस स्पर्धेचे तिसरे विजेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे. याआधी सायनाने 2011 आणि 2012 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.

यावेळी तिसरे मानांकन मिळालेल्या सायनाचा सलामीचा सामना पात्रता फेरीतील खेळाडूशी होणार असला तरी उपांत्य फेरीत तिच्यासमोर चीनच्या हे बिंगजियाओ हिचे आव्हान असणार आहे. वैष्णवी रेड्डी हिला इस्टोनियाच्या क्रिस्तिन कुबा हिचा सामना करावा लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)