साठवण तलावावरून काळे-कोल्हे यांच्यात बाचाबाची

प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले 
कोपरगाव  – कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलाव क्र. पाचच्या कामासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदार गायत्री कन्स्ट्रक्‍शनला काम देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या आदेशन्वये बोलविलेल्या प्रांत व तहसीलदार यांच्या उपस्थितीतील बैठकीत कोसाकाचे अध्यक्ष आशुतोष काळे व संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्यात आरेतुरेची भाषा सुरू झाली. त्याचबरोबर काळे यांचे कार्यकर्तेही भिडले. यातून 15 मिनिटे गोंधळ झाल्यानंतर आशुतोष काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आमचे धरणे आंदोलन सुरूच राहील, असा खुलासा केला.

कोपरगाव येथील नगरपालिकेच्या साठवण तलाव क्र.5 चे काम सुरू व्हावे, म्हणून अनेक दिवसांपासून काळे-कोल्हे-वहाडणे समर्थकांमध्ये मागणी सुरू होती. यात नगराध्यक्ष विजय वहाडणे-संजय काळेंच्या मते गायत्री कन्स्ट्रक्‍शन तलावाची खोदाई करुन गाळ काढण्यास तयार होते. यावर ठाम होते, तर कोल्हे समर्थकांकडून गायत्री हे काम करण्यास अनुत्सुक असल्याचे सांगत होते. काळे समर्थकांनी कुठल्याही परिस्थितीत साठवण तलाव क्र 4 व 5 चे काम झालेच पाहिजे, यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.

प्रशासनाने याची दखल घेतली व कोपरगांव येथे तहसील कार्यालयात बैठक बोलावली. या बैठकीस आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोसाकाचे अध्यक्ष आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र सोनवणे, गायत्री कन्स्ट्रक्‍शनचे प्रोजेक्‍ट मॅनेजर ताताराव डुंगा व इतर ठराविक पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठक ही ठराविक निमंत्रितांसाठी होती. त्यात बिपीन कोल्हे यांना निमंत्रण नव्हते, अशी तक्रार काळेंनी अधिकाऱ्यांकडे करुन बैठकीतून त्यांना बाहेर जाण्याची सूचना केली. परंतु तरीही बैठक सुरु झाली.

बैठकीत गायत्री कन्स्ट्रक्‍शनने काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान बिपीन कोल्हे यांनी बैठकीत या विषयी बराच ऊहापोह झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक होऊन अंतिम निर्णय होणार आहे. आज टंचाई बैठक आयोजित केली आहे. तेंव्हा प्रांत शिंदे व तहसीलदार चंद्रे यांनी बैठकीकडे चलावे, म्हणून निर्देश दिले. परंतु काळे यांचे बैठकीत झालेल्या विषयावर समाधान झाले नाही. त्यांना अधिकाऱ्यांशी चर्चा करावयाची होती. परंतु बिपीन कोल्हे यांनी दरडावून आता बैठक संपली तुम्ही चला, असे म्हणताच काळेही चिडेले. तुम्ही जा, आम्ही बोलतो, असे ते म्हणाले. त्यानंतर उभयतांमध्ये वाद सुरू झाले. हे सुरू असतानाच ते एकमेकांवर चालून गेले.

शब्दाने शब्द वाढत गेला व शेवटी काळे व कोल्हे समर्थकांत जोरदार धुमश्‍चक्री झाली. शेवटी अधिकाऱ्यांना मध्यस्ती करून प्रकरण शांत करावे लागले. शहराचा पाणीप्रश्‍न कायम स्वरुपी मिटण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. त्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांत यांना निवेदने दिली, बैठका झाल्या, आंदोलने झाली, ठरावालाही अनुमती दिली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याने आता जोपर्यंत हे काम होत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करीतच राहु. सातत्याने प्रशासनाकडून मिळत नसलेल्या प्रतिसादातून आम्ही धरणे आंदोलन करण्यावर ठाम आहोत, असे काळे यांनी सांगितले.

जे बैठकीत अपेक्षित नव्हते, ज्यांना आमंत्रण नव्हते, असे (बिपीन कोल्हे यांचे नांव न घेता) लोक उपस्थित राहीले. मी त्यांना बसण्यास विरोध केला. त्याचा राग त्यांना आला असेल, म्हणूनच त्यांचा आरडाओरडा सुरु झाला. आमच्या अंगावर धावून आले व अशोभनिय वर्तन त्यांनी केला, याबद्दल काळे यांनी खेदही व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)