‘आझमभाई’ भाजपात, पुत्र ‘निहाल’ राष्ट्रवादीत

मुले पळविण्याचे लोण आता पिंपरी-चिंचवडमध्येही

पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण ढवळू लागले असून ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी गुरुवारी रात्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पुत्राने प्रवेश केला असला तरी आझम पानसरे हे मात्र अद्यापही भाजपातच आहेत. राज्यभरात सुरू असलेले नेत्यांची मुले पळविण्याचे लोण आता पिंपरी-चिंचवडमध्येही पोहोचले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर प्रभाव असणारे आणि मुस्लीम आणि बहुजन समाजात प्राबल्य असणारे आझम पानसरे हे शरद पवार यांचे निष्ठावंत होते. मात्र राष्ट्रवादीत त्यांची घुसमट होवू लागल्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पानसरे यांच्या प्रवेशामुळे भाजपाला महापालिकेत सत्ता मिळविणे सोपे गेले. या प्रवेशावेळी भाजपाचे काही आश्‍वासने पानसरे यांना दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने राजकारणापासून दूर होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा पानसरे यांचे महत्त्व अधोरेखीत झाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आझम पानसरे यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. भेट केवळ वैयक्तीक असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निहाल पानसरे यांच्या प्रवेशामुळे पानसरे यांच्याशी भेट राजकीयच होती यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुरुवारी सायंकाळी निहाल पानसरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी झालेल्या कार्यक्रमास अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांच्यासह शहरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

निहाल यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या पाठीशी मुस्लीम आणि बहुजन समाजातील मतदार उभे राहतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पुत्राला राष्ट्रवादीत पाठविणे म्हणजेच आपलाही पाठींबा पार्थ आणि अमोल कोल्हे यांनाच असल्याचा संदेश आझम पानसरे यांनी दिल्याचे बोलले जात आहे. शिरुर आणि मावळ मतदारसंघात पानसरे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे.

एका बाजूला दोन मतदारसंघात ताकद वाढविणाऱ्या राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार दणका दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील घराण्यातील पुत्राला दोनच दिवसांपूर्वी भाजपाने पळविले होते. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा नेत्याच्या मुलाला आपल्या पक्षात आणून उत्तर दिल्याची चर्चा रंगली आहे. पुत्राच्या प्रवेशानंतर आता आझम पानसरे राष्ट्रवादीत कधी डेरेदाखल होतात याकडे लक्ष लागले आहे.

भाजपाकडूनही पानसरेंची फसवणूक
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिलेली आश्‍वासने पाळली जात नाहीत. खच्चीकरण करून अडगळीत टाकण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे आझम पानसरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रवेशावेळी विधानपरिषदेवर संधी दिली जाईल, व पक्षात मानाचे स्थान दिले जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या चार, साडेचार वर्षांत या आश्‍वासनाची पुर्तता झाली नाही. त्यामुळे पानसरे समर्थकांमध्ये भाजपाने फसविल्याची भावना निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांचा रेटा आणि शरद पवार आणि अजित पवार यांनी भेट घेवून पक्षात येण्याची केलेली विनंती यामुळेच निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)