#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)

-राजीव मुळ्ये

वाघाला शोधताना त्याच्या पाऊलखुणांवरून माग काढला जातो; परंतु अवनीसारखी एखादी वाघीण कायमची जाते, तेव्हा तिच्या पाऊलखुणांचा माग आपण काढत नाही. “ब्लेम गेम’ सुरू होतो; थोडे दिवस राजकारण तापतं आणि नंतर सगळं थंडगार होतं. यवतमाळ जिल्ह्यात अवनी नावाच्या वाघिणीला ठार केल्यानंतर असंख्य प्रश्‍न विचारले जातायत आणि “न्यायालयाची परवानगी होती,’ याव्यतिरिक्‍त सरकारकडे दुसरं उत्तर नाही. अवनीला मारणं खरोखर गरजेचं होतं का, यासह अनेक प्रश्‍न आपल्या सर्वांना अडचणीचे आहेत आणि ते ऑप्शनला टाकलेलेच बरे!

वन्यजीव जेव्हा अशा प्रकारे मानवी वस्त्यांच्या जवळपास दिसू लागतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष उद्‌भवण्याची चिन्हं दिसू लागतात, तेव्हाच समतोल पर्याय शोधण्याची गरज असते. शेतीचं नुकसान झाल्यास किंवा गोठ्यातली जनावरं वन्यजीवांनी पळवून नेल्यास शेतकऱ्यांना संताप अनावर होणं स्वाभाविक आहे. परंतु अशा प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची आपल्याकडील प्रक्रिया कशी आहे? जिथून पाळीव जनावर पळवलं, त्या जागेचा उतारा आणायचा, पंचनामा करायचा, पाळीव जनावर वनक्षेत्रात गेलं नव्हतं हे सिद्ध करायचं आणि ढीगभर कागद सादर केल्यानंतर अनेक महिन्यांनी तुटपुंजी भरपाई मिळणार!

ही प्रक्रिया सुलभ करताच येणार नाही का? वेगवेगळ्या विकास प्रकल्पांमुळं वन्यजीवनावर होत असलेले गंभीर दुष्परिणाम खरोखर टाळता येण्यापलीकडचे आहेत का? नैसर्गिक संसाधनांचं अतिरिक्त दोहन करून प्रचंड संपत्ती निर्माण करणं, हा सध्याच्या अर्थकारणाचा पाया. परंतु ही संसाधनं एकट्या माणसाच्या मालकीची नाहीत. त्यावर शतकानुशतकं पोसलेली एक जैवसाखळी तयार झालेली आहे. वाघ हा या जैवसाखळीचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. ही साखळी अबाधित राहील, असा विचार करून विकास साधताच येणार नाही का, हा मुख्य प्रश्‍न आहे. एखाद्या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना जसे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आमंत्रित केले जातात, तसे पर्यावरणाच्या क्षेत्रातले तज्ज्ञही बोलावले जातात.

त्या प्रकल्पाचे काय परिणाम होतील, याविषयी ते अहवाल देतात. असे अहवाल प्राप्त करण्याची प्रक्रिया खरोखर पारदर्शक असते का? आपण किती चुकतो आणि वन्यजीव किती चुकतात? असो, हे प्रश्‍न सोयीचे नाहीत. वाघिणीला खलनायिका ठरवणं तुलनेनं सोपं आहे. न्यायालयात तशीच बाजू मांडली जाते आणि एखादी अवनी जिवाला मुकते.

अवनी गेली; पण तिनं दोन बछडे आणि असंख्य प्रश्‍न मागं ठेवलेत. हे बछडे कदाचित जगू शकणार नाहीत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. हिंस्र वन्यजीवांमध्ये “पिलावरची मादी’ अत्यंत घातक असते, असं अभ्यासक नेहमी सांगतात. मांजरीच्या नवजात पिलाला हाताळलं, तर तीही “फिस्स्‌’ करून अंगावर येते. अवनी तशीच होती. पिलांचं रक्षण कोणत्याही परिस्थितीत करण्यास तत्पर असलेली ती “आई’ होती.

आसपासच्या प्रत्येक धोक्‍यावर ती तुटून पडली आणि “नरभक्षक’ म्हणून बदनाम झाली. तिला माणसाएवढी समज असती, तर या बदनामीचा तिला नक्कीच त्रास झाला असता. पण तिला आपल्याइतकी विचारशक्ती नाही आणि आपल्याकडे तिच्यासाठी बंदुकीच्या गोळीव्यतिरिक्त दुसरं उत्तर नाही. म्हणूनच, सरकारकडेही न्यायालयीन आदेशाच्या कागदाव्यतिरिक्त दाखवण्यासारखं दुसरं काही नाही. वनक्षेत्राची आखणी, त्यात होणाऱ्या बदलांची नोंद, त्याच्या संभाव्य परिणामांची माहिती सरकारलाही द्यायची नाही आणि आम्हालाही ती नको आहे.

आम्ही एकदाच “शतकोटी’ वृक्ष लावून जबाबदारीतून मोकळे होणार. पुढे ती झाडं जगली की मेली हेही पाहणार नाही. अवनीला जिथं मारलं, तिथं उद्या खरोखर काही प्रकल्प उभे राहिले, तरी त्याचं सोयरसुतक आम्हाला नसेल. त्यात मिळणारा रोजगार महत्त्वाचा असेल आणि तोपर्यंत अवनीलाही आम्ही विसरलेले असू. कदाचित त्यावेळी दुसरीच अवनी खलनायिका ठरलेली असेल. आम्ही तिलाही मारू.

गीरचे सिंह मेल्याचं आम्हाला दुःख नाही आणि अवनी मेल्याचंही नाही. तिच्या मृत्यूपाठोपाठ उत्तर प्रदेशातल्या दुधवा व्याघ्र अभयारण्याजवळ शेतकऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी मारून एका वाघिणीला अर्धमेलं केलं आणि नंतर तिला ट्रॅक्‍टरखाली चिरडलं. चिरडू देत! जोपर्यंत मानवजात जिवंत आहे, ती अडचणीत आलेली नाही आणि तिचा वेगानं विकास होत आहे, तोपर्यंत या क्षुल्लक प्राण्यांच्या मृत्यूची फिकीर करण्याचं कारणच काय?

‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-1)   ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)