#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-1)

-राजीव मुळ्ये

वाघाला शोधताना त्याच्या पाऊलखुणांवरून माग काढला जातो; परंतु अवनीसारखी एखादी वाघीण कायमची जाते, तेव्हा तिच्या पाऊलखुणांचा माग आपण काढत नाही. “ब्लेम गेम’ सुरू होतो; थोडे दिवस राजकारण तापतं आणि नंतर सगळं थंडगार होतं. यवतमाळ जिल्ह्यात अवनी नावाच्या वाघिणीला ठार केल्यानंतर असंख्य प्रश्‍न विचारले जातायत आणि “न्यायालयाची परवानगी होती,’ याव्यतिरिक्‍त सरकारकडे दुसरं उत्तर नाही. अवनीला मारणं खरोखर गरजेचं होतं का, यासह अनेक प्रश्‍न आपल्या सर्वांना अडचणीचे आहेत आणि ते ऑप्शनला टाकलेलेच बरे!

यवतमाळ जिल्ह्यातली “अवनी’ नामक नरभक्षक वाघीण अखेर मारली गेली. दिवाळीच्या दोन दिवस आधीच फटाके वाजवून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. ज्या ठिकाणी वाघिणीनं पहिली मानवी शिकार केली, त्याच ठिकाणी तिला मारल्याचा आनंद जरा जास्तच होता. “अवनी’ गेली; पण मागे अनेक अनुत्तरित प्रश्‍न ठेवून!

तिच्या मृत्यूनंतर वन्यजीवप्रेमींनी ते उपस्थित केले आणि त्यांची नेहमीप्रमाणं यथेच्छ खिल्लीही उडवली गेली. “”वाघीण मेल्यावर हे जागे झाले,” असं म्हटलं गेलं. सोशल मीडियावर तर “”अशा नरभक्षक वाघिणी ह्यांच्या घरात सोडा,” अशी टिप्पणीही करण्यात आली. कल्पना करा, मेल्या वाघिणीवर अश्रू ढाळणाऱ्यांची इतकी टर उडवली जाते, तर ती जिवंत असताना कुणी मध्ये पडलं असतं, तर त्याची काय गत झाली असती? खरं तर त्या वाघिणीला मारण्यासाठी जे काही खटाटोप सुमारे महिनाभर सुरू होते, ते अधिक खिल्ली उडवण्याजोगे होते.

टेहळणी करण्यासाठी दोन हत्ती आणले. ते उपाशी ठेवल्यामुळं पिसाळले आणि तेच माणसं मारू लागले, तेव्हा त्यांची परतपाठवणी केली. नंतर महागड्या इटालियन कुत्र्यांची जोडी आणली. त्यांची किंमत आणि रोजचा मेन्टेनन्सचा खर्च वगैरे लोकांनी पेपरात वाचला. पण या कुत्र्यांनाही अवनीचा माग काढता आला नाही. एक पॅराग्लाइडर की पॅरामोटार आणलं, तेही हवेत उडण्याऐवजी खड्डयात गेलं. वाघिणीला आकर्षित करण्यासाठी मारलेल्या परफ्यूमला अवनीनं जराही दाद दिली नाही.

हे सगळं सुरू असताना मोजके का होईना, वन्यजीवप्रेमी अवनी जिवंत राहावी यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. आता केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यासह अनेकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवलेली असताना आणि असंख्य प्रश्‍न विचारले जात असताना, “न्यायालयाची अवनीला मारण्यास अनुमती होती,’ याव्यतिरिक्त कोणतंही उत्तर राज्याच्या वनविभागाकडे नाही. या एका उत्तरामुळं बाकीचे प्रश्‍न ऑप्शनला टाकता येतील, ही मानसिकता गडदपणे दिसतेय. परंतु कायदे माणसांसाठी तयार केले जातात आणि त्याआधारे न्यायालयीन निवाडे दिले जातात. पर्यावरणविषयक कायद्यांमधूनही “माणूस’ आणि “विकास’ हे दोन शब्द वापरून असंख्य पळवाटा शोधल्या जातात.

त्यामुळं निसर्गाच्या बाबतीत “नियमात बसणारं; परंतु नीतिमत्तेत न बसणारं’ बरंच काही करण्याची माणसाला सूट मिळते. त्या आधारेच आतापर्यंत माणसानं प्राण्यांच्या विश्‍वात बेसुमार अतिक्रमण केलंय आणि ते नियमात बसवलं तरी नीतिमत्तेत बसणारं नाही. मुख्य म्हणजे, ते निसर्गनियमात बसणारं नाही. अवनीला ठार मारण्यासाठी तिचा शोध सुरू होता, त्याच वेळी “लिव्हिंग प्लॅनेट’चा ताजा अहवाल हाती आलेला होता; परंतु “अत्यंत महत्त्वाच्या’ इतर घडामोडींपुढे आपल्याला त्याची दखल घ्यायला सवड नव्हती.

जगभरातील प्राणिमात्रांच्या तब्बल 30 टक्‍के प्रजाती अवघ्या 44 वर्षांच्या कालावधीत या पृथ्वीतलावरून कायमच्या नष्ट करण्याचा “पराक्रम’ आपण केल्याचं या अहवालात म्हटलंय. तंत्रमंत्राच्या युगात पर्यावरण हेही एक “विज्ञान’ आहे, हे आपल्याला पटत नाही आणि जीडीपी केंद्रित विकासनीती आपल्याला त्याकडे लक्ष देण्याची मुभाही देत नाही. म्हणूनच आम्ही जंगलांमध्ये घुसून खाणींपासून वीकेन्ड होमपर्यंत सर्वकाही करतो आहोत आणि दोन पिलांची आई असलेल्या अवनीला “नरभक्षक’ म्हणून गोळ्या घालतो आहोत.

‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)   ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)