#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)

-राजीव मुळ्ये

वाघाला शोधताना त्याच्या पाऊलखुणांवरून माग काढला जातो; परंतु अवनीसारखी एखादी वाघीण कायमची जाते, तेव्हा तिच्या पाऊलखुणांचा माग आपण काढत नाही. “ब्लेम गेम’ सुरू होतो; थोडे दिवस राजकारण तापतं आणि नंतर सगळं थंडगार होतं. यवतमाळ जिल्ह्यात अवनी नावाच्या वाघिणीला ठार केल्यानंतर असंख्य प्रश्‍न विचारले जातायत आणि “न्यायालयाची परवानगी होती,’ याव्यतिरिक्‍त सरकारकडे दुसरं उत्तर नाही. अवनीला मारणं खरोखर गरजेचं होतं का, यासह अनेक प्रश्‍न आपल्या सर्वांना अडचणीचे आहेत आणि ते ऑप्शनला टाकलेलेच बरे!

अवनीच्या मृत्यूनंतर विचारले जात असलेले प्रश्‍न दुर्लक्षिण्याजोगे नाहीत. लोकशाहीत विरोधी पक्ष विरोधच करतात आणि सत्ताधारी पक्ष त्यांची “केवळ विरोधासाठी विरोध’ म्हणून वासलात लावतात. परंतु त्यामुळं प्रश्‍न डावलता येत नाहीत. बड्या उद्योजकांना उद्योग सुरू करता यावेत म्हणून अवनीचा बळी घेतला गेल्याचा आरोप आहे.

त्याचप्रमाणं, डोलोमाइट आणि लाइमस्टोन अशा सिमेंटनिर्मितीसाठी उपयुक्त खनिजांचा भरपूर साठा त्या भागात असून, त्या भूभागावर अवनीची दहशत असल्यामुळंच तिला मारलं गेलं, हा आरोपही गंभीर आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असलं, तरी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्याच्या वनविभागाला कारवाईचा इशारा दिला आहे.

याखेरीज अवनी खरोखर नरभक्षक होती का? तिला मारताना सर्व नियमांचं पालन केलं गेलं का? तिला मारण्यासाठी बोलावलेल्या शार्पशूटरची पार्श्‍वभूमी काय आहे? अवनीला बेशुद्ध करून अन्यत्र हलवता आलं नसतं का? असे अनेक प्रश्‍न विचारले जातायत आणि “कोर्टाची परवानगी होती,’ हे एकच उत्तर या प्रश्‍नांना देऊन काहीच उपयोग नाही. मनेका गांधींनी तर ही “राजकीय आणि गुन्हेगारी स्वरूपाची कृती’ असल्याचं म्हटलंय.

अवनीनं तेरा जणांचा बळी घेतला होता आणि परिसरातील शेतकरी तिच्या भीतीमुळं शेतात जाऊ शकत नव्हते, हे खरं आहे. परंतु याच यवतमाळ जिल्ह्यात धोकादायक कीटकनाशकांनी जेव्हा असंख्य शेतकऱ्यांचा बळी घेतला, तेव्हा बंदी असलेली कीटकनाशकं विकणाऱ्यांविरुद्ध सरकारनं काय केलं, हेही सरकारनं सांगायला हवं.

बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेला गुन्हेगार अल्पवयीन असल्यास कायदा त्याला शिक्षा देत नाही; कारण तो भल्या-बुऱ्याचा विचार करण्यास सक्षम नाही, असं मानलं जातं. पण अवनीकडून मात्र भल्या-बुऱ्याचा विचार करण्याची अपेक्षा आपण ठेवतो. वन्यजीवांवर ही वेळ का येते, याचाही विचार आपण करत नाही.

मानव-वन्यजीव संघर्ष अनेक ठिकाणी वाढत चाललाय. वन्यजीवांनी पिकांची नासधूस करणं, माणसांवर हल्ले करून त्यांना जायबंदी करणं, ठार मारणं असे प्रकार सातत्यानं आपल्या कानावर येत असतात. परंतु ही परिस्थिती अचानक उद्‌भवली आहे का? 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि शिकारीवर निर्बंध आले.

काही वर्षांपूर्वी एका जुन्या राजवाड्यात भिंतीवर लटकवलेले जुने फोटो पाहायला मिळाले. एकेका फोटोत सहा-सात वाघ एकाच वेळी मारल्याचं दिसतं. आज त्या संपूर्ण परिसरात जंगल नावाला शिल्लक नाही. कोणे एके काळी असलेलं वनवैभव इतक्‍या वेगानं नाहीसं कसं झालं, असा विचार तो फोटो पाहून जोपर्यंत आपल्या मनाला शिवत नाही, तोपर्यंत असंख्य प्रश्‍नांची उकल आपल्याला होणार नाही.

कायदा अस्तित्वात आल्यानंतर शिकार कमी होऊन वन्यजीवांची संख्या वाढली. परंतु वनक्षेत्र क्रमशः कमीच होत राहिलं. नव्वदीच्या दशकात आपण खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं आणि विकास हवा असेल तर निसर्गाचा बळी जाणं “अपरिहार्यच’ आहे, असं आपल्याला वाटू लागलं. जंगलं झपाट्यानं कमी होत गेली. गवताळ प्रदेशांवर अतिक्रमण झालं. त्यामुळं तृणभक्षी वन्यजीवांची संख्या घटली आणि त्यांच्या शिकारीवर जगणाऱ्या जंगली जनावरांचं खाद्य कमी झालं.

जंगलातले पाणीसाठे कमी झाल्यामुळं जनावरांची तहान भागेनाशी झाली. असे वन्यजीव मानवी वस्त्यांच्या दिशेनं वळणं स्वाभाविक आहे. वस्तुतः जंगलाचं सुरक्षित क्षेत्र सोडून वन्यजीव मानवी वस्त्यांकडे सहसा वळत नाहीत. परंतु आज ही बाब सर्रास दिसण्याचं कारण संकोचलेलं वनक्षेत्र हेच आहे.

‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-1)   ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)