तक्रारदारांचे नाव नसणाऱ्या भ्रष्टाचार आरोपांची दखल घेऊ नका 

केंद्र सरकारचा सर्व सरकारी विभागांना नवा आदेश 
नवी दिल्ली: स्वताचे नाव जाहीर न करता सरकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणी कोणी तक्रार अर्ज सादर केले किंवा त्यांची माहिती दिली तर त्यावर कोणतीही कार्यवाही करू नका असा नवीन आदेश केंद्र सरकारने काढला आहे. कार्मिक विभागाने केंद्र सरकारच्या सर्व विभागांना हा आदेश जारी केला आहे. अशा निनावी तक्रारी सरळ दप्तरी दाखल करा असेही या आदेशात म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या अनेक खात्यांमध्ये उच्चपदस्थांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यात सादर झाल्या आहेत त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चपदस्थ सरकारी कर्मचाऱ्याला कोणतीही नवी जबाबदारी देताना त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात कोणत्या तक्रारी आहेत काय हे पाहिले जाते. त्यावर त्याचे भवितव्यही अवलंबून असते पण त्याच्या विरोधात जर कोणी हेतुपुरस्सर निनावी तक्रारी दाखल केल्या असतील तर त्याचा त्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला नाहक त्रास होतो म्हणून ही उपाययोजना करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप कितीही गंभीर असला तरी जर त्या तक्रारदाराने स्वतःचे नाव लिहीले नसेल तर त्यावर यापुढे कोणतीही कारवाई आता केली जाणार नाही. केंद्रीय दक्षता आयोगानेही असेच आदेश सर्व विभागांना जारी केले आहेत.कोणत्याही प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप दाखल करणाऱ्या अर्जदाराने अर्जावर आपले पुर्ण नाव आणि पत्ता ही किमान माहिती दिलेली असली पाहिजे. सध्या निनावी तक्रारीवरून केली जाणारी चौकशीही थांबवण्याच्या सुचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)