रोज सरासरी चार वाहने लंपास 

संग्रहित छायाचित्र

दुचाकीचोर ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी
अवघ्या 24 टक्‍के गुन्ह्यांची उकल

अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वतंत्र आयुक्‍तालय स्थापन झाल्यावर चोऱ्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा होती. परंतु आयुक्‍तालय स्थापन झाल्यापासून म्हणजेच 327 दिवसांमध्ये तब्बल 1411 वाहने चोरीला गेली आहेत. अर्थात रोज सरासरी चार वाहने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतून चोरली जात आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांसोबतच वेगवेगळ्या शाखाही वाहनचोरांना गजाआड करण्यात सपशेल अयशस्वी होताना दिसून येत आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उलगडण्याची टक्‍केवारी अवघी 24 टक्‍के इतकीच आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या दोन्ही परिमंडळांमध्ये दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने चोरांची टोळी पोलिसांसाठी डोकीदुखी बनली आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वंतत्र आयुक्‍तालयाची स्थापना झाल्यानंतर चोऱ्या, घरफोडी, लुटमारीच्या घटना कमी होतील, अशी आशा नागरिकांना होती. मात्र, या घटनांवर आळा घालताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असल्याचे दिसत आहे.

मागील काही दिवसांत शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. घरफोड्या रोखण्याचे आव्हान असतानाच आता वाहनचोरीचा आकडा देखील वाढू लागला आहे.
गेल्या आठवड्यापासून दुचाकी चोरीच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. शहरात नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या मोटारसायकली, रुग्णालयाबाहेर, मंगल कार्यालयाबाहेर लावलेल्या मोटारसायकली चोरटे सहज चोरतात. रात्रीच्या वेळी घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी चोरण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरीक ही त्रस्त झालेले आहेत.

आयुक्‍तालयाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यत वाहन चोरीचे एकूण 1 हजार 411 गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी परिमंडळ एकमध्ये 547 गुन्हे तर परिमंडळ दोनमध्ये 864 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्या तुलनेत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसत आहे.

भरदिवसा पळविल्या दुचाकी
घरासमोर पार्क केलेली वाहने रात्री चोरुन नेण्याचे प्रमाण अधिक असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये भर दिवसाही दुचाकी चोरल्या केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. भोसरी येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी भर दिवसा अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.4) घडली. त्याच बरोबरच हिंजवडी येथेही गुरुवारीच (दि.4) सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली. तर वाकड येथे देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरांनी लॉक तोडून चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

का वाढल्या चोऱ्या
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या अधिक आहे. केवळ मौज-मजेसाठी वाहन चोरी करणारी हे अल्पवयीन आरोपी पोलीस रेकॉर्डवरही नसतात. त्यामुळे जोपर्यंत पोलिसांना यांच्याबद्दल इत्यंभूत माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्यांचे उद्योग सुरूच राहतात. दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात खूप मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या इमारती परंतु काही मोजके गृहप्रकल्प सोडले तर नागरिकांनी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्याची तस्दी घेतलेली नाही. जास्तीत जास्त जागेत बांधकाम करुन खोल्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे बहुतेक वाहने ही घराबाहेर रस्त्यावर पार्क केली जातात. यामुळे चोरांसाठी शहरात जिथे-तिथे उभी केलेली वाहने म्हणजे एक प्रकारचे निमंत्रणच ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)