बावधनसह परिसरातील डोंगरावरील शेकडो झाडांना कावडीतून पाणी
वाई – दिवसेंदिवस ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल पाहून गेल्या काही वर्षांपासून देशभरात “झाडे लावा झाडे जगवा’चा नारा घुमू लागला आहे. मात्र, वाई तालुक्यातील बावधन येथील संजय भोसले नावाचा अवलिया गेल्या 30 वर्षांपासून डोंगर परिसरातील झाडांना कावडीच्या सहाय्याने पाणी घालून त्यांना जगवत आहे, त्यांचे संगोपन करत आहे. संजय भोसले यांचे हे कार्य समाजासाठी नक्कीच एक दिशा देणार असून सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे आता त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहे.
संजय भोसले हे सकाळी 6 वाजता घरातून कावड घेऊन निघतात. नळाचे पाणी भरून बावधन शेजारी असणाऱ्या डोंगरावर जातात. तिथे त्यांनी लावलेल्या झाडांना ते पाणी घालतात. हे काम ते गेल्या तीस वर्षांपासून करीत आहेत. झाडांविषयी प्रेम व्यक्त करताना ते म्हणाले, हे काम करत असताना खूप लोकांनी अवेहलना केली, काही लोक हसले, परंतु मला याची मनापासून आवड असल्याने मी हे झाडांना पाणी घालण्याचे काम गेल्या 30 वर्षांपासून अखंडित करत राहिलो.
या कामाची बावधन गावाने दखल घेऊन सत्कार केल्यावर मात्र हसणाऱ्या लोकांची तोंड बंद झाली. संजय भोसले यांना एका व्यक्तीने विचारले की तुला यातून काय मिळते. त्यावर संजय भोसले यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिले, मला या कामातून आत्मिक आनंद मिळतो, मला आता याची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यायाम देखील होतो व झाडांची जोपासना करताना त्यांची जसजशी वाढ होते तसे मानसिक समाधान देखील मिळते.